लादेनला मारायला मदत करणारा डॉक्टर बसला आमरण उपोषणाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 16:18 IST2020-03-02T16:16:21+5:302020-03-02T16:18:24+5:30
आफ्रिदीने लादेनला ठार करण्यासाठी अमेरिकेला मदत केली होती. यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी शकीलवर दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे खोटे आरोप ठेवण्यात आले.

लादेनला मारायला मदत करणारा डॉक्टर बसला आमरण उपोषणाला
कराची : अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला मारण्यासाठी अमेरिकेला मदत करणारा डॉक्टर आजही जेलमध्ये सडत आहे. हा डॉक्टर पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये आमरण उपोषणाला बसला आहे. 2011 मध्ये लादेनला अमेरिकेने ठार केले होते.
शकील आफ्रिदी असे या डॉक्टरचे नाव आहे. त्याने खोटे लसीकरण करण्याचे भासवत अमेरिकेला लादेनचा पत्ता सांगितला होता. यानंतर त्याला पाकिस्तानने तुरुंगात टाकले. आफ्रिदीचा भाऊ जमील हा पंजाब प्रांतातील जेलमध्ये शकीलला भेटून आला. यावेळी त्याने वृत्तसंस्था एएफपीला सांगितले की, त्याच्या कुटुंबीयांसोबत अन्याय आणि अत्याचार केले जात आहेत. याला विरोध करण्यासाठी शकील उपोषणाला बसला आहे.
शकीलचे वकील कमर नदीम यांनीही यास दुजोरा दिला आहे. दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप ठेवून शकीलला मे 2012 मध्ये 33 वर्षांसाठी तुरुंगात धाडण्यात आले. नंतर त्याची शिक्षा 10 वर्षांनी कमी करण्यात आली.
आफ्रिदीने लादेनला ठार करण्यासाठी अमेरिकेला मदत केली होती. यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी शकीलवर दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे खोटे आरोप ठेवण्यात आले. 2011 मध्ये लादेनला पाकिस्तानच्या भूमीत जाऊन ठार केल्यामुळे हे त्यांच्या सैन्यासाठी लाजिरवाणे होते. आफ्रिदीलाही वकिलाला भेटण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. त्याच्या कुटुंबीयांनाही पाकिस्तानचे अधिकारी त्रास देत आहेत, असे अमेरिकी सदस्याचे म्हणणे आहे.
डोनाल्ड ट्रम्पचेही घुमजाव
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारावेळी सांगितले होते की, आफ्रिदीला सोडण्यासाठी पाकिस्तानला सांगणार आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, ट्रम्प यांनी राष्ट्रध्यक्ष बनताच यावर सोईस्कर मौन बाळगले.