जगभरात डॉक्टरांना पसंती, तर नेत्यांना ठेंगा !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 08:45 AM2021-10-28T08:45:46+5:302021-10-28T08:46:18+5:30

यासंदर्भात २८ देशांमध्ये  नुकतीच जागतिक पाहणी करण्यात आली. या सर्वेक्षणाचे काही निष्कर्ष ‘अपेक्षित’ असे निघाले, तर, काही निष्कर्ष असे आहेत, ज्यांचा आपण विचारही केला नसेल.

Doctors around the world like it, but leaders like it! | जगभरात डॉक्टरांना पसंती, तर नेत्यांना ठेंगा !

जगभरात डॉक्टरांना पसंती, तर नेत्यांना ठेंगा !

googlenewsNext

कोणत्या व्यावसायिकांवर तुमचा सर्वाधिक भरोसा आहे?, हा व्यावसायिक आपल्याला कधीही फसवणार नाही किंवा आपल्या व्यवसायाशी तो बहुतांश प्रामाणिक राहील असं वाटतं?, समजा, काही सर्वमान्य व्यावसायिक घेतले, ज्यांच्याशी आपला सर्वाधिक संबंध येतो.. उदाहरणार्थ, डॉक्टर, वकील, शिक्षक, न्यायाधीश, पोलीस, सैनिक, बँकर्स, नेते, सर्वसामान्य माणूस, सरकारी मंत्री, सरकारी कर्मचारी, पत्रकार, टीव्ही न्यूज अँकर्स, संशोधक, पुजारी... यातील कोणते व्यावसायिक तुम्हाला जास्त भरवशाचे वाटतात?..

यासंदर्भात २८ देशांमध्ये  नुकतीच जागतिक पाहणी करण्यात आली. या सर्वेक्षणाचे काही निष्कर्ष ‘अपेक्षित’ असे निघाले, तर, काही निष्कर्ष असे आहेत, ज्यांचा आपण विचारही केला नसेल. फ्रान्सच्या इप्सोस नावाच्या कंपनीनं ‘ग्लोबल ट्रस्टवर्दीनेस इंडेक्स-२०२१’ अंतर्गत हा अभ्यास केला गेला. गेली काही वर्षे यासंदर्भात ते अभ्यास करीत आहेत. सर्वसामान्य माणसांचा डॉक्टरांवर भरवसा असण्याचं चित्र फार पूर्वीपासून आहे. अलीकडच्या काळात त्या भरवशाला गळती लागली होती, पण, कोरोना काळात लोकांनी डॉक्टरांना पुन्हा उचलून धरलं आहे आणि त्यांच्यावर प्रथम विश्वास दाखवला आहे.

याआधी अनेक वर्षे पहिला क्रमांक संशोधकांचा होता. त्यांच्यावर लोकांनी कायम विश्वास दाखवला आहे. डॉक्टरांपेक्षाही ते कायम वरच्या क्रमांकावर होते. यंदा मात्र डॉक्टरांनी संशोधकांना मागे सारले आहे. अर्थातच कोरोनाकाळात डॉक्टरांनी दिलेल्या अविरत सेवेला लोकांनी सलाम केला आहे. जगभरात सरासरी ६४ टक्के लोकांनी डॉक्टरांवर विश्वास दाखवला आहे. यंदा दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या संशोधकांना ६१ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तिसरा क्रमांक लागतो शिक्षकांचा. जगभरातील सरासरी ५५ टक्के लोकांनी शिक्षक विश्वासार्ह असल्याचं म्हटलं आहे. या यादीत सगळ्यात तळाचा क्रमांक पटकावला आहे तो राजकारण्यांनी. केवळ दहा टक्के लोकांनी राजकारण्यांवर भरोसा असल्याचं म्हटलं आहे. 

खालून दुसरा क्रमांक लागतो तो सरकारी मंत्र्यांचा. केवळ १४ टक्के लोकांना मंत्री विश्वासार्ह असल्याचं वाटतं. ग्रेट ब्रिटनच्या लोकांनी डॉक्टरांवर सर्वाधिक भरोसा दाखवला आहे. २०१८ मध्ये ६७ टक्के लोकांनी डॉक्टरांना विश्वासार्ह मानलं होतं, यंदा मात्र त्यांची टक्केवारी वाढून ती ७२ पर्यंत पोहोचली आहे. त्याखालोखाल डच (७१ टक्के) आणि कॅनेडियन (७० टक्के) लोकांना डॉक्टर विश्वासार्ह वाटतात. २०१९ आणि २०२१ च्या तुलनेत हंगेरी आणि चिली या देशांतील लोकांचा डॉक्टरांवरील भरोसा १९  टक्क्यांनी, सौदी अरेबिया १७ टक्क्यांनी, तर, ब्राझील आणि रशियाच्या लोकांचा डॉक्टरांवरील भरोसा दहा टक्क्यांनी वाढला आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षांत काही देशांतील डॉक्टरांचं रेटिंग मात्र बरंच खाली गेलं आहे. दक्षिण कोरियाच्या केवळ ३८ टक्के लोकांनी डॉक्टरांवर विश्वास दाखवला आहे. जपान आणि मेक्सिकोच्या लोकांचाही डॉक्टरांवरील विश्वास कमी झाला आहे. 

बाकी अनेक व्यावसायिकांनी आपला निचांक कायम राखला आहे. गेल्या तीन वर्षांत जगात राजकारण्यांवर लोकांनी सतत नापसंतीचं बोट केलेलं दिसतं. राजकारणी काहीच भरोशाचे नाही, सांगतील काय, करतील काय, यावर जगभरात एकमत आहे. अलीकडे डॉक्टरांचा क्रमांक वर गेला असला, तरी संपूर्ण जगभरात गेल्या काही वर्षांत संशोधकांवरील लोकांची पसंती कमी झालेली नाही. दहापैकी किमान सहा लोकांनी संशोधकांवर नेहमीच विश्वास दाखवला आहे. पसंतीतलं त्यांचं स्थान फारसं कधी घटलं नाही. २०१९ च्या तुलनेत सौदी अरेबियात संशोधकांच्या पसंतीत १७ टक्क्यांनी, हंगेरीत १३ टक्क्यांनी, ब्राझीलमध्ये ९ टक्क्यांनी तर, कॅनडात ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अर्जेंटिना आणि मेक्सिको या देशांतील संशोधकांवरील पसंती मात्र अनुक्रमे ११ आणि ८ टक्क्यांनी घटली आहे. शिक्षकांनी सलग तिसऱ्या वर्षी आपला तिसरा क्रमांक कायम ठेवला आहे. यंदा जगातील ५५ टक्के लोकांनी त्यांच्यावरचा विश्वास कायम ठेवला. समाजात काही तरी सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता शिक्षकांमध्ये आहे, असं लोकांना वाटतं. 

प्रत्येक देशानुसार व्यावसायिकांवरील पसंती वेगवेगळी असली, तरी पसंतीच्या सरासरी क्रमवारीत डॉक्टर्स, संशोधक आणि शिक्षक यांनी बाजी मारली आहे, तर राजकारणी आणि मंत्री यांनी  आपला तळाचा क्रमांक कायम ठेवला आहे. बँकर्स, एक्झिक्युटिव्हज आणि पत्रकार या व्यावसायिकांनाही आपली विश्वासार्हता फारशी वाढवता आलेली नाही. विश्वासाच्या यादीतील त्यांचा क्रमांकही बऱ्यापैकी खाली आहे. 

२८ देशांचा सहभाग
इप्सोस कंपनीनं प्रत्येक देशांतील ठराविक नमुने घेऊन ऑनलाइन पद्धतीनं ही पाहणी केली. त्यात भारतासह पुढील देशांनी सहभाग घेतला होता.. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्राझील, कॅनडा, चिली, चीन, कंबोडिया, फ्रान्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, हंगेरी, इटली, जपान, मलेशिया, मेक्सिको, नेदरलॅण्ड्स, पेरू, पोलंड, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, स्पेन, स्वीडन, तुर्की आणि अमेरिका. अनेक व्यावसायिकांना या यादीत पुढच्या वर्षी आपलं स्थान आणखी मजबूत करण्याची इच्छा आहे. 

Web Title: Doctors around the world like it, but leaders like it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.