अमेरिकेच्या व्हिसासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक असतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 10:00 AM2019-02-16T10:00:00+5:302019-02-16T10:00:03+5:30

व्हिसाच्या प्रकारावरुन त्यासाठी आवश्यक कागदपत्रं ठरतात

documents required and helpful for US Visa interview | अमेरिकेच्या व्हिसासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक असतात?

अमेरिकेच्या व्हिसासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक असतात?

googlenewsNext

प्रश्न- अमेरिकेच्या व्हिसा मुलाखतीसाठी मी कोणते कागदपत्रं आणायला हवेत? यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक असतात?

 उत्तर- तुम्ही कोणत्या प्रकारच्या व्हिसासाठी मुलाखत देणार आहात, यावरुन आवश्यक कागदपत्रं ठरतात. मात्र सर्व प्रकारच्या व्हिसासाठी तुम्हाला खालील कागदपत्रं गरजेची असतात. 

1. तुमचा सध्याचा पासपोर्ट. तुम्ही जितका काळ अमेरिकेत राहणार आहात, तितक्या कालावधीपर्यंत या पासपोर्टची मुदत असायला हवी. तुम्ही तुमचे सर्व जुने पासपोर्ट आणल्यास ते जास्त सोयीचं ठरेल. 
2. DS-160 कन्फर्मेशन पेज
3. तुम्हाला मुलाखतीसाठी पाठवण्यात आलेल्या पत्राची प्रत. या पत्रात मुलाखतीची तारीख असते. दूतावासात प्रवेश करण्यासाठी हे पत्र गरजेचं आहे. 
4. तुम्ही ज्या प्रकारच्या व्हिसासाठी अर्ज केला आहे, त्यासाठी आवश्यक इतर कागदपत्रं.

काही विशिष्ट प्रकारच्या व्हिसासाठी अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, स्टुडंट व्हिसासाठी अर्ज करताना शैक्षणिक संस्थेकडून देण्यात आलेला आय-20 फॉर्म आणि SEVIS पेमेंटची पावती गरजेची असते. H1B व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांनी I-797 नोटीस ऑफ ऍक्शनची झेरॉक्स किंवा मूळ प्रत आणावी. जे एक्स्चेंज व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांनी DS-2019, SEVIS पेमेंटची पावती आणि प्रशिक्षण योजना (लागू होत असल्यास) ही कागदपत्रं घेऊन यावीत. विशिष्ट प्रकारच्या व्हिसासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त कागदपत्रांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या. 

अमेरिकेच्या नॉन इमिग्रंट व्हिसासाठी अर्ज केल्यावर मुलाखतीची प्रक्रिया सुरू होते. ही प्रक्रिया कागदपत्रांशी संबंधित नसते. या प्रक्रियेत सहभागी असणारे अधिकारी अतिरिक्त कागदपत्रांच्या तुलनेत DS-160 अर्जातील माहिती आणि अर्जकर्त्यासोबतचा संवाद यावर भर देतात. मात्र काही अर्जकर्ते इतर कागदपत्रं स्वत:सोबत घेऊन येतात. यामध्ये अमेरिकेतील संपूर्ण प्रवासाचा खर्च, प्रवासाचा उद्देश यासंबंधित कागदपत्रांचा समावेश असतो. मात्र यातील कोणकोणती कागदपत्रं पाहायची नाहीत किंवा कोणत्या अतिरिक्त कागदपत्रांची मागणी करायची, याचा अधिकार दूतावासातील अधिकाऱ्यांना असतो, याची नोंद घ्यावी.

सूचना- मुलाखतीला येताना खोटी कागदपत्रं आणू नका. बोगस कागदपत्रं दाखवण्याचा किंवा व्हिसासाठी पात्र ठरता यावं यासाठी चुकीची माहिती दिल्यास तुम्हाला भविष्यात कधीही अमेरिकेचा व्हिसा दिला जाणार नाही.

मुलाखतीला येताना कमीत कमी सामान आणा. सामान ठेवण्यासाठी दूतावासात फारशी जागा नसते. अमेरिकेच्या दूतावासात मोठ्या बॅग्स, द्रव पदार्थ, खाद्य पदार्थ, लायटर आणि माचिस आणण्याची परवानगी नाही. मोबाईल फोन्स, टॅबलेट्स, लॅपटॉप्स, कॅमेरा, पेन ड्राईव्ह, सीडी/डीव्हीडी यासारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणंदेखील दूतावासात आणण्याची परवानगी नाही. तुम्ही व्हिसासाठी आवश्यक कागदपत्रं आणि इतर गरजेचं सामान पाऊचमधून घेऊन येऊ शकता. 
 

Web Title: documents required and helpful for US Visa interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.