बोट बुडून ७०० दगावले?
By admin | Published: April 20, 2015 03:15 AM2015-04-20T03:15:29+5:302015-04-20T03:15:29+5:30
युरोपीय देशात स्थलांतरितांची तस्करी करणारी बोट लिबियाच्या उत्तरेकडे शनिवारी मध्यरात्री भूमध्य समुद्रात बुडाल्याने ७०० जणांना जलसमाधी मिळाली असावी अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
रोम : युरोपीय देशात स्थलांतरितांची तस्करी करणारी बोट लिबियाच्या उत्तरेकडे शनिवारी मध्यरात्री भूमध्य समुद्रात बुडाल्याने ७०० जणांना जलसमाधी मिळाली असावी अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी रात्रीपर्यंत बोटीतील २४ स्थलांतरितांचे मृतदेह हाती लागले होते व २८ जणांना सुखरूप वाचविण्यात आले. इतर शेकडो बेपत्ता आहेत. भूमध्यसागरातील स्थलांतरितांची ही सर्वात मोठी दुर्घटना ठरण्याची शक्यता आहे.
यादुर्दैवी अपघाताप्रकरणी इटालीच्या तटरक्षक दलाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार ही २० मीटर लांब नौका सागरात पलटली असावी. नौकेतील प्रवासी पोर्तुगीज व्यापारी नौका जवळ येत असल्याचे पाहून नौकेच्या एका बाजुला आले असावेत, त्यामुळे नौका उलटली. या नौका दुर्घटनेतील फक्त २८ लोक वाचले असल्याचे संयुक्त राष्ट्रातील निर्वासित संघटनेच्या प्रवक्त्या कार्लोटा सामी यांनी स्काय जी २४ न्यूजला सांगितले. वाचलेल्या लोकांनी सांगितलेल्या माहितीनुसार बोटीत ७०० पेक्षा जास्त लोक होते. माल्टचे पंतप्रधान जोसेफ मस्कत यांनी मात्र, वाचलेल्या लोकांचा आकडा ५० असल्याचे सांगितले. (वृत्तंसस्था)