अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला झटका, ब्रिटनमधील 4 हजार कोटींची संपत्ती जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 10:22 AM2017-09-13T10:22:23+5:302017-09-13T10:22:23+5:30
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मोठा झटका मिळाला आहे. डॉन दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधील संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली, दि. 13 - कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मोठा झटका मिळाला आहे. डॉन दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधील संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 6.7 बिलियन डॉलरची संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. म्हणजे भारतीय चलनानुसार दाऊद इब्राहिमच्या तब्बल 4 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणण्यात आली आहे.
ब्रिटनमध्ये दाऊद इब्राहिमचे हॉटेल आणि कित्येक घरं आहेत, ज्यांची किंमत हजारो कोटी रुपयांच्या घरात आहे. गेल्या महिन्यातच ब्रिटन सरकारनं आर्थिक निर्बंधसंबंधीच्या यादीमध्ये दाऊदच्या नावाचा समावेश केला होता. यासंदर्भात भारतानं ब्रिटनला पूर्वीच अहवालदेखील सुपूर्द केला आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात यूकेकडून मालमत्ता गोठवण्यासंदर्भातील जारी करण्यात आलेल्या यादीत दाऊद इब्राहिमच्या पाकिस्तानातील 3 ठिकाणांचाही उल्लेख करण्यात आला होता. ब्रिटनच्या अर्थमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या 'Financial Section Targets in the UK' या यादीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पाकिस्तानातील 3 ठिकाणांच्या पत्त्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
ब्रिटननं जारी केलेल्या यादीनुसार, कासकर दाऊद इब्राहिमचे पाकिस्तानातील ठिकाणांचे पत्ते, 1) हाऊस नं. 37, मार्ग क्रमांक 30, डिफेंस हाऊसिंग अथॉरिटी, कराची, पाकिस्तान. 2)नूराबाद, कराची, पाकिस्तान आणि 3) व्हाइट हाऊस सौदी मस्जिदजवळ, क्लिफ्टन, कराची या पत्त्यांचा समावेश आहे. फोर्ब्स मॅगझिननुसार जगातील मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहिमची एकूण संपत्ती 6.7 अब्ज डॉलर एवढी आहे. दाऊद इब्राहिम हा जगातील क्रमांक दोनचा सर्वाधिक श्रीमंत असा डॉन असल्याचे मानले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, 1993 मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिमची ब्रिटनमध्ये 4 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे.