डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाले तर 28 टक्के अमेरिकन्स घेणार कॅनडाचा आसरा
By admin | Published: May 21, 2016 06:52 PM2016-05-21T18:52:04+5:302016-05-21T18:55:33+5:30
डोनाल्ड ट्रम्प जर अमेरिकेचे अध्यक्ष झाले तर 28 टक्के अमेरिकी नागरिकांनी देश सोडून कॅनडाला जाऊ असं एका पाहणीमध्ये सांगितलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
न्यू यॉर्क, दि. 21 - डोनाल्ड ट्रम्प जर अमेरिकेचे अध्यक्ष झाले तर 28 टक्के अमेरिकी नागरिकांनी देश सोडून कॅनडाला जाऊ असं एका पाहणीमध्ये सांगितलं आहे. मुस्लीम, मेक्सिकन, चीन, भारत अशा अनेकांविरोधात जहाल वक्तव्य करणाऱ्या ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेतील एक मोठा मतदारवर्ग असल्याचे दिसत आहे. विशेषत: डाव्या विचारसरणीच्या लोकांनी ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले तर कॅनडाचा रस्ता धरू असे म्हटल्याचे सांगण्यात येत आहे.
गुगलच्या निरीक्षणानुसार ट्रम्पनी सात राज्यांमध्ये आघाडी घेतल्यानंतर How can I Move to Canada या प्रश्नामध्ये 350 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दोन्ही बाजुच्या लोकांसाठी हे ध्रुवीकरण मार्केटिंगची संधी देणारं ठरलं असून, अनेकांनी जाहिरातींच्या क्लृप्त्या लढवल्या आहेत. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले तर तुम्ही देश सोडणार असाल तर आम्हाला कॉल करा आम्ही तुमचं घर विकून देऊ अशी जाहिरात करण्यात आली आहे.
तर दुसऱ्या बाजुने ट्रम्प यांच्यासारखा राष्ट्राध्यक्ष सहन करण्यापेक्षा आम्ही तुम्हाला छान कॅनडातील जोडीदार मिळवून देऊ अशा जाहिराती होत आहेत. ही जाहिरात करून एका डेटिंग साईटनं वाहत्या गंगेत हात धुवून घेत आपला निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे अशा संधीच्या शोधात असलेल्या 30 हजार अमेरिकन्सनी लगेच या डेटिंग साईटवर नाव नोंदलं आहे.
कॅनडामध्ये नागरिकत्व मिळण्यासाठी सल्ला देण्याचं काम करणाऱ्या एका व्यावसायिकानं आपल्याशी अनेकांनी संपर्क साधला असून ट्रम्प अध्यक्ष झाल्यास आम्ही कॅनडाला येऊ असं म्हटलं आहे.