VIDEO: ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुरू असताना व्हाईट हाऊसच्या बाहेर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 06:52 AM2020-08-11T06:52:27+5:302020-08-11T06:52:43+5:30
व्हाईट हाऊसबाहेर गोळीबार होताच ट्रम्प यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुरू असताना व्हाईट हाऊस बाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. खुद्द ट्रम्प यांनी घटनेला दुजोरा दिला. बहुधा एक व्यक्तीला गोळी लागली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली. गोळीबार होताच ट्रम्प यांना गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षित स्थळी नेलं.
व्हाईट हाऊस बाहेरील परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर ट्रम्प यांनी पत्रकारांना संबोधित केलं आणि घडलेल्या घटनेची माहिती दिली. 'व्हाईट हाऊसच्या बाहेर गोळीबार झाला. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आहे. मी गुप्तचर विभागाच्या कर्मचाऱ्यांचा आभारी आहे. त्यांनी अतिशय तातडीने कारवाई केली. एकाला रुग्णालयात नेण्यात आलं आहे. बहुधा त्या व्यक्तीवर गुप्तचर विभागातील कर्मचाऱ्यांनी गोळी झाडली', असं ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितलं.
#WATCH US: Secret Service agents escorted President Donald Trump out of White House briefing room shortly after the start of a news conference.
— ANI (@ANI) August 10, 2020
After returning to the news conference, President Trump informed reporters that there was a shooting outside the White House. pic.twitter.com/msZou6buGP
साडे सहा कोटी जणांची कोरोना चाचणी
पत्रकारांशी संवाद साधताना डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील कोरोना संकट रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. अमेरिकेत आतापर्यंत साडे सहा कोटी जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. जगातील इतर कोणत्याही देशाने इतक्या मोठ्या प्रमाणात चाचण्या केलेल्या नाहीत. भारतात जवळपास 1 कोटी कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यांची लोकसंख्या 150 कोटींच्या आसपास आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत आपल्याला कोरोनावरील लस मिळालेली असेल असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला.