"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 02:57 PM2024-10-05T14:57:00+5:302024-10-05T15:01:39+5:30
Donald Trump on Iran Israel War: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला इराणच्या न्युक्लिअर अर्थात अणुकेंद्रांवर हल्ला करण्याचा सल्ला दिला आहे.
Iran Israel War Donald Trump: अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि सध्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवत असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल-इराण संघर्षावर मोठे विधान केले आहे. इराणणेइस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली, त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करायला हवे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या विधानानंतर आले आहे. बायडन यांनी इस्रायल-इराण संघर्षामुळे युद्ध उद्भवण्याची शक्यता नाही. इस्रायलने प्रत्युत्तर देताना इराणच्या अणुकेंद्रावर हल्ले करू नये, असे म्हटले होते.
इराणने इस्रायलवर २०० क्षेपणास्त्र डागली. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल इराणच्या अणुकेंद्रांना लक्ष्य करू शकते, याबद्दल जो बायडन यांना प्रश्न विचारण्यात आला होता. बायडन यांनी दिलेल्या उत्तरावर डोनाल्ड ट्रम्प बोलत होते.
"इस्रायलने इराणच्या अणुकेंद्रावर आधी हल्ले करायला हवे, चिंता नंतर करावी", असा सल्ला ट्रम्प यांनी नेत्यान्याहू यांना दिला.
डोनाल्ड ट्रम्प यांची जो बायडन यांच्यावर टीका
राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, "त्यांना (जो बायडन) विचारलं गेलं की, इराणबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? तुम्ही इराणवर हल्ला करणार का? ते म्हणाले की, जोपर्यंत ते अणुकेंद्रांवर हल्ला करणार नाही. हीच ती गोष्ट आहे, ज्यावर त्यांना हल्ला करण्याची इच्छा आहे."
"बायडन यांनी इस्रायलला इराणच्या अणुकेंद्रावर हल्ले करायला सांगायला हवं होतं आणि इतर गोष्टींचा विचार नंतर करायचा होता. ते जर असं करण्याचा विचार करत असतील, तर ते तसं करतीलच. पण, आम्ही त्यांच्या योजनेबद्दल माहिती काढू", असेही ट्रम्प म्हणाले.