Donald Trump: अमेरिका महापतनाकडे! सौदीसमोर हात पसरण्याची वेळ; माजी राष्ट्राध्यक्षांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 01:44 PM2022-09-07T13:44:57+5:302022-09-07T13:46:19+5:30
रशियाकडून तेल पुरवठा ठप्प झाल्यानंतर अमेरिका या सौदी आणि व्हेनेझुएलाला तेल उत्पादन वाढवण्याची विनंती करत आहे.
अमेरिकेचे महापतन होत असल्याचा आरोप करून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन यांच्यावर कठोर टीका केली आहे. एफबीआयच्या छाप्यांनंतर ट्रम्प यांनी केलेली जहरी टीका आहे.
आपला देश एका महापतनाकडे जात आहे. गेल्या काही काळापासून आपण अपयशी ठरत आहोत. महागाई ४० वर्षांच्या रेकॉर्ड पातळीवर आहे. इंधनासाठी आम्हाला सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला सारख्या देशांकडे भीक मागावी लागत आहे. आम्ही तर अफगाणिस्तानाच सपशेल नांगी टाकली आणि ८५ अब्ज डॉलर्सची शस्त्रे तिथेच टाकून आलोय, असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.
आम्ही एक असा देश बनलो आहोत जिथे खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत आणि तिथे प्रसारमाध्यमे मुक्त नाहीत. अर्थव्यवस्था विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. अमेरिकेत गुन्हेगारी पूर्वीसारखी वाढत आहे. इराणला अणुबॉम्ब बनवण्याची परवानगी देत आहोत. चीनने अमेरिकेकडून अब्जावधी डॉलर्स घेतले आहेत आणि त्यातून आम्हालाच आव्हान देण्यासाठी त्यांचे सैन्य तयार करत आहे. अमेरिकेला आता जगात जुमानले जात नाहीय, असा आरोप ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर केला. ट्रम्प यांनी आरोपांचा व्हिडीओ जारी केला आहे.
अमेरिकेची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. आपला देश आता तर चेष्टेचा विषय बनला आहे, असे ट्रम्प म्हणाले. रशियाकडून तेल पुरवठा ठप्प झाल्यानंतर अमेरिका या सौदी आणि व्हेनेझुएलाला तेल उत्पादन वाढवण्याची विनंती करत आहे. अशातच सौदी अरेबिया आणि ओपेक देशांनी तेल उत्पादनात कपात करण्याची घोषणा केली आहे. यामुळे अमेरिकेला मोठा झटका बसला आहे.