पाकचे पंतप्रधान इम्रान यांनी पुन्हा आळवला काश्मीरचा राग, ट्रम्प यांची मध्यस्थीची इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 08:29 AM2020-01-22T08:29:02+5:302020-01-22T08:56:03+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीरच्या मुद्द्यावर मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
दावोसः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीरच्या मुद्द्यावर मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्रम्प यांची भेट घेतली असता, पुन्हा एकदा काश्मीरच्या मुद्द्यावर भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याची भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केली.
ट्रम्प यांच्या भेटीनंतर इम्रान म्हणाले, काश्मीरसह इतर मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली आहे. आम्ही भारत-पाकिस्तानसंबंधी काश्मीरच्या मुद्द्यावर विचार करत आहोत. जर आम्हाला शक्य झाल्यास नक्कीच मदत करू. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीसुद्धा काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची इच्छा प्रकट केली होती. परंतु भारतानं त्यांची मागणी धुडकावून लावली होती. काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा असून कोणत्याही तिसऱ्या देशानं यात मध्यस्थता करण्याची गरज नसल्याचं मोदी सरकारनं सांगितलं होतं.
US President Donald Trump during his meet with Pakistan PM Imran Khan in Davos:We're doing more trade as it turns&we're working together on some borders.We are talking about Kashmir in relation to what is going on with Pakistan&India.We've been watching that&following it closely. pic.twitter.com/acaUirCStW
— ANI (@ANI) January 21, 2020
दोन्ही देशांना बोलायचं आहे 'हॅलो'
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारत आणि पाकिस्तान दौऱ्यासंबंधी काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. भारताचा दौरा केल्यानंतर ते पाकिस्तानमध्ये जाणार आहेत का?, सध्या तरी असा काहीही प्लॅन नसल्याचं इम्रान खान यांनी सांगितलं. परंतु दोन्ही देशांना मी 'हॅलो' बोलू इच्छितो. कारण या दोन्ही देशांबरोबर आमचे फार जुने संबंध आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करताना पाकिस्तान आणि भारतादरम्यान अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या काश्मीर मुद्द्यावर भाष्य केलं होतं. काश्मीरच्या मुद्द्यावर मी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी संपर्कात आहे. अमेरिकेची काश्मीरच्या मुद्द्यावर बारीक नजर आहे.