कोर्टाने झटका दिल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प संतप्त, घेतला मोठा निर्णय
By admin | Published: February 6, 2017 02:04 PM2017-02-06T14:04:53+5:302017-02-06T14:36:59+5:30
सात मुस्लिम देशातील नागरीकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याचा निर्णय रद्द केल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या न्यायालयांवर संताप व्यक्त केला
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 6 - सात मुस्लिम देशातील नागरीकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याचा निर्णय रद्द केल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील न्यायालयांवर संताप व्यक्त केला आहे. न्यायपालिका अमेरिकींना धोक्यात टाकू शकते असा इशारा त्यांनी दिला. याशिवाय न्यायालयाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांनी अमेरिकेत येणा-यांची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
एखादा न्यायाधीश देशाची सुरक्षा अशाप्रकारे धोक्यामध्ये टाकू शकतो यावर विश्वास बसत नाही. जर काही झालं तर त्यासाठी न्यायव्यवस्थेला दोषी धरलं जावं, बाहेरून लोकं देशात येतच आहेत, हे वाईट आहे. असं ट्वीट ट्रम्प यांनी केलं.
Just cannot believe a judge would put our country in such peril. If something happens blame him and court system. People pouring in. Bad!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) February 5, 2017
आपल्या देशात येणा-यांची चौकशी सावधगिरी बाळगून करा असा आदेश मी दिला आहे. न्यायालय हे काम कठीण करत आहे, असं ट्वीट ट्रम्प यांनी केलं आहे.
I have instructed Homeland Security to check people coming into our country VERY CAREFULLY. The courts are making the job very difficult!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) February 5, 2017
वॉशिंग्टनमधील न्यायालयाने ट्रम्प यांच्या आदेशाची अंमलबजावणी करु नये असा निर्णय दिला आहे. न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया आणि मासाच्युसेटस येथील न्यायालयानेही असाच निकाल दिला होता. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाला आपल्या निर्णयावरुन माघार घ्यावी लागली आहे.
या निर्णयामुळे इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया व येमेन या मुस्लीम देशातील नागरीकांचा अमेरिकेत प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ट्रम्प यांच्या आदेशामुळे या देशातील नागरीकांना 90 दिवस प्रवेश बंदी लागू झाली होती. ज्यांच्याकडे वैध अमेरिकी व्हिसा आहे व ग्रीन कार्ड आहेत त्यांनाही याचा फटका बसला होता.