संधी मिळताच त्याने धडाधड गोळ्या झाडल्या; अचूक हल्ला करण्यासाठी हल्लेखोर फिरत होता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 11:07 AM2024-07-15T11:07:21+5:302024-07-15T11:08:53+5:30

ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा जगभरातील दिग्गज नेत्यांकडून निषेध

Donald Trump attacks As soon as he got the chance, he shot furiously; The attacker was moving around to make a precise attack | संधी मिळताच त्याने धडाधड गोळ्या झाडल्या; अचूक हल्ला करण्यासाठी हल्लेखोर फिरत होता

संधी मिळताच त्याने धडाधड गोळ्या झाडल्या; अचूक हल्ला करण्यासाठी हल्लेखोर फिरत होता

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अचूक हल्ला करता यावा यासाठी हल्लेखोर या छतावरून त्या छतावर कसा जात होता, याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली, तर दुसऱ्याने गोळीबार करणाऱ्याला पाहिल्याचा दावा केला.

प्रत्यक्षदर्शी बेन मॅसर म्हणाले की, ते सुरक्षा गराड्याच्या बाजूने उभे होते आणि त्यांनी त्या हल्लेखोराला एका छतावरून दुसऱ्या छतावर जाताना पाहिले. बटलरचे रहिवासी रायन नाइट यांनीही अमेरिकी ग्लास रिसर्च इमारतीच्या वर संशयित हल्लेखोर पाहिल्याचे सांगितले. “गोळीबाराच्या  २० मिनिटे आधी, मी ट्रम्प होते त्या गराड्याजवळ जाऊन उभा राहिलो. तेव्हा मी एजीआर इमारतीजवळ होतो आणि हल्लेखोर तेथे होता. मी तेथे बसलो असताना एका माणसाने त्याच्याकडे बंदूक असल्याचे सांगितले. मी वर पाहिले तर इमारतीच्या वर एक माणूस बंदूक व अंगावर ब्लँकेट पांघरलेला दिसला आणि तो राष्ट्राध्यक्षांना लक्ष्य करत होता. त्याने धडाधड चार ते पाच गोळ्या झाडल्या.  मी वर पाहिले तर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी झाडलेली गोळी हल्लेखोराच्या डोक्यात लागली होती,” असा थरारक अनुभव त्यांनी सांगितला.

निवडणुकीवर काय परिणाम?

nट्रम्प यांच्या चेहऱ्यावर रक्ताचे ओघळ दिसत आहेत, ते आपल्या हाताची मूठ घट्ट आवळून हवेत उंचावत आहेत. त्यांचे अंगरक्षक सुरक्षेचे कवच तयार करून त्यांना मंचापासून दूर नेत आहेत. हे छायाचित्र झपाट्याने व्हायरल झाले असून, नोव्हेंबर महिन्यातील निवडणुकीला कलाटणी देणारेदेखील ठरू शकते.

nहे छायाचित्र ट्रम्प यांचे सुपुत्र एरिक ट्रम्प यांनी लगेचच सोशल मीडियावर टाकले. "अमेरिकेला अशाच लढवय्याची गरज आहे," असे त्यांनी म्हटले. या घटनेनंतर बायडन यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेने सर्व प्रकारची राजकीय वक्तव्ये थांबवली आहेत. टीव्हीवरील जाहिरातीही थांबविल्या आहेत.

nट्रम्प यांच्यावर या परिस्थितीत राजकीय हल्ला चढविणे अयोग्य ठरेल असे त्यांना वाटते. ट्रम्प यांच्याजवळचे सहकारी आणि समर्थक मात्र बायडेन यांनाच या हिंसाचाराचा दोष देत आहेत. एकूणच अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराचे स्वरूप आता बदलणार आहे.

जगभरातील दिग्गज नेत्यांकडून निषेध

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान कीयर स्टार्मर, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की, न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन, तैवानचे अध्यक्ष लाइ चिंग-ते, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह विविध जागतिक नेत्यांनी ट्रम्प यांच्या हत्येच्या प्रयत्नाचा निषेध करीत राजकारण आणि लोकशाहीमध्ये हिंसाचारासाठी जागा नाही, असे म्हटले आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस, माजी अध्यक्ष बराक ओबामा, जॉर्ज डब्ल्यू. बुश आणि बिल क्लिंटन यांनी ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे.

ट्रम्प यांची सुरक्षा वाढवणार

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचार पथकाने प्रचारसभेत झालेल्या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर ट्रम्प यांची सुरक्षा अधिक मजबूत करण्याची घोषणा ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेच्या व्यवस्थापक सुसी विल्स आणि ख्रिस लासिविटा यांनी केली आहे.

वय 20, गणितात होता हुशार

ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न करणारा बंदूकधारी थॉमस मॅथ्यू क्रुक्स हा २० वर्षीय तरुण ट्रम्प यांच्याच पक्षाचा नोंदणीकृत मतदार होता.

त्याने नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत प्रथमच मतदान केले असते. त्याने यापूर्वी  रिपब्लिक संबंधित एका गटाला छोटी देणगीही दिली होती, असा दावा सीएनएनने केला आहे.

थॉमसने २०२२ मध्ये बेथेल पार्क हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली होती, त्याला राष्ट्रीय गणित आणि विज्ञान उपक्रमांतर्गत ५०० डॉलरचा ‘स्टार अवॉर्ड’ मिळाला होता, असे निवडणूक आयोगाच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.

हे राष्ट्राध्यक्ष थाेडक्यात वाचले

फ्रॅंकलिन रुझावेल्ट : अमेरिकेचे ३२वे राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन रुझावेल्ट यांच्यावर फेब्रुवारी १९३३मध्ये गाेळीबार झाला. त्यात ते जखमी झाले नाही. मात्र, शिकागाेचे महापाैर एंटन कर्माक यांचा मृत्यू झाला.

हॅरी ट्रुमेन : ३३ वे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमेन यांच्यावर नाेव्हेंबर १९५० मध्ये दाेन बंदुकधाऱ्यांनी गाेळाबार केला. ट्रुमेन त्यातून बचावले. मात्र, व्हाइट हाऊसचा पाेलिस कर्मचारी आणि एका हल्लेखाेराचा मृत्यू झाला.

गेराल्ड फाेर्ड : फाेर्ड यांच्यावर १९७५ मध्ये दाेनवेळा हल्ला करण्यात आला. त्यात ते बचावले हाेते.

राेनाल्ड रिगन : रिगन यांच्यावर १९८१मध्ये गाेळीबार झाला. नंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

जाॅर्ज डब्ल्यू बुश : २००५ मध्ये बुश हे जाॅर्जियाचे राष्ट्राध्यक्ष मिखाइल साकाश्विली यांच्यासाेबत एका रॅलीत सहभागी झाले हाेते. त्यावेळी त्यांच्या दिशेने हे हातबाॅम्ब फेकण्यात आला. ताे फुटलाच नाही.

थियाेडाेर रुझावेल्ट : माजी राष्ट्राध्यक्ष थियाेडाेर रुझावेल्ट यांच्यावर १९१२मध्ये प्रचारादरम्यान गाेळीबार झाला हाेता.

जाॅर्ज वाॅलेस : १९७२मध्ये राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जाॅर्ज वाॅलेस यांच्यावर मेरीलॅंडमध्ये गाेळी झाडण्यात आली हाेती. या घटनेत त्यांचा कमरेखालील भाग निकामी झाला हाेता.

Web Title: Donald Trump attacks As soon as he got the chance, he shot furiously; The attacker was moving around to make a precise attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.