डोनाल्ड ट्रम्प यांची मीडियावर मात

By admin | Published: November 9, 2016 02:45 PM2016-11-09T14:45:02+5:302016-11-09T14:44:53+5:30

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आले आणि त्यांनी प्रसारमाध्यमं कितीही पक्षपाती असली तरी ते जनमत बदलू शकत नाहीत यावर शिक्कामोर्तब केलं आहे

Donald Trump beat the media | डोनाल्ड ट्रम्प यांची मीडियावर मात

डोनाल्ड ट्रम्प यांची मीडियावर मात

Next
>योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आले आणि त्यांनी प्रसारमाध्यमं कितीही पक्षपाती असली तरी ते जनमत बदलू शकत नाहीत यावर शिक्कामोर्तब केलं आहे. बहुतांश प्रसारमाध्यमांनी जाहीरपणे ट्रम्पविरोधात भूमिका घेतली आणि हिलरी यांच्या विजयाचा चंग बांधला. प्रसारमाध्यमांवर लक्ष ठेवणाऱ्या एका संस्थेने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला असून ट्रम्प यांच्या तुलनेत हिलरी यांना अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा कसा प्रयत्न मीडियाने केला याचा लेखाजोखाच यात मांडण्यात आला आहे. हिलरी क्लिंटन यांना तब्बल 84 प्रसारमाध्यमांनी पाठिंबा जाहीर केला तर ट्रम्प यांच्यामागे 10पेक्षा कमी प्रसारमाध्यमे उभी राहिली. ट्रम्प यांनीही वेळोवेळी प्रसारमाध्यमे पक्षपातीपणा करत असल्याची तक्रार केली होती. प्रसारमाध्यमांनी घेतलेल्या आदल्या दिवशीच्या पोलमध्ये हिलरी यांना 95 इतकी पसंती दाखवण्यात आली होती. परंतु, अवघ्या 10 ते 12 तासातच हे पोलकर्ते उघडे पडले आणि पसंतीचा हा तराजू क्लिंटन यांना 5 व ट्रम्प यांना 95 इतका झुकला.
 
प्रसारमाध्यमांनी ट्रम्प यांच्याबाबत केलेल्या पक्षपातीपणाची काही उदाहरणं...
 
- डोनाल्ड ट्रम्प यांच्या बद्दलच्या नकारात्मक बातम्या व सकारात्मक यांचं प्रमाण 11 - 1 इतकं विषम होतं.
- मीडिया रिसर्च सेंटर या संस्थेनं एबीसी, सीबीएस आणि एनबीसी या प्रमुख प्रसारमाध्यमांचं विश्लेषण केलं आणि अहवाल तयार केला.
- जुलै 29 ते ऑक्टोबर 20 या कालावधीत ट्रम्प यांच्या संदर्भात झालेल्या एकूण उल्लेखांपैकी 91 टक्के उल्लेख नकारात्मक कारणांसाठी होते. अवघ्या 9 टक्के वेळा ट्रम्प यांच्याबद्दल चांगलं बोललं गेलं.
- पसंतीच्या बाबतीत ट्रम्प यांना क्रम इतका खाली होता, की काहीजणांच्या मते, अमेरिकेच्या इतिहासातील सगळ्यात कमी पसंती असलेले उमेदवार तेच होत.
- ट्रम्प यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वाद विवादांवर प्रमुख वृत्तवाहिन्यांनी 440 मिनिटे खर्ची घातली तर हिलरी क्लिंटन यांच्याबाबतीत मात्र त्यासाठी अवघी 185 मिनिटे खर्ची घालण्यात आली.
- ट्रम्प यांनी महिलांबाबत केलेल्या विधानांचा पाठपुरावा करताना वृत्तवाहिन्यांनी 102 मिनिटे प्रसारण केलं, मात्र क्लिंटन फाउंडेशनच्या घोटाळ्याची चर्चा करण्यासाठी फक्त 24 मिनिटे देण्यात आली. विशेष म्हणजे ट्रम्प व खान कुटुंब यांच्यातील विवादाच्या चर्चेवर 23 मिनिटं देण्यात आली होती.
- क्लिंटन यांनी सरकारी गुप्त माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी खासगी सर्व्हर वापरल्याच्या व ईमेल घोटाळाप्रकरणी वृत्तवाहिन्यांनी 40 मिनिटं खर्ची घातली, जी ट्रम्प यांनी 11 वर्षांपूर्वी महिलांसदर्भात केलेल्या विधानाचा पाठपुरावा करण्यासाठी दिलेल्या वेळेच्या निम्मी देखील नाहीत.
- ट्रम्प टॅक्स भरत नाहीत हे सांगण्यासाठी 33 मिनिटांचा प्राइम टाइम देण्यात आला, तसेच स्थलांतरीतांच्या बाबतीतील ट्रम्प यांच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी 32 मिनिटांचा वेळ देण्यात आला.
 
प्रसारमाध्यमांचे अंदाज हिलरींचा विजय निश्चित असल्याचा होता
 
हिलरी क्लिंटन यांना जणू काही विजयी करण्याचा चंगच अमेरिकेतल्या प्रसारमाध्यमांनी बांधला असल्याचे दिसून येत होते. शेवटच्या क्षणापर्यंत सगळे अंदाज, सगळे आडाखे ट्रम्प विरोधात वर्तवून ट्रम्प यांच्याविरोधात जनमत करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत होता.
 
डोनाल्ड ट्रम्प यांनी इलेक्टोरल व्होट किंवा मतसंघाची 276 मते मिळवत अवघी 215 मते मिळवणाऱ्या हिलरींचा दणदणीत पराभव केला आणि अमेरिकी प्रसारमाध्यमांना जनमताचा अंदाज आला नाही की त्यांनी जाणूनबुजून ट्रम्प यांना पाडण्यासाठी आपल्या संपूर्ण नेटवर्कचा वापर केला असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे.
 
एक गोष्ट मात्र यातून निश्चितच स्पष्ट झाली आहे, की अमेरिकी प्रसारमाध्यमं तुमच्या सोबत असोत वा तुमच्या विरोधात असोत त्यांच्यावर विश्वास ठेवावा का नाही असा प्रश्न आहे. प्रसारमाध्यमं काहीही सांगोत अथवा कितीही जनमत चाचण्या दाखवोत, जनतेच्या मनात काय आहे हे मतमोजणी झाल्यावरच कळतं आणि प्रसारमाध्यमं जनमत फारसं बदलवू शकत नाहीत हेच खरं!

Web Title: Donald Trump beat the media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.