डोनाल्ड ट्रम्पचा भारताला दणका; २ एप्रिलपासून जेवढ्यास-तेवढा टॅक्स आकारणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 05:32 IST2025-03-06T05:31:10+5:302025-03-06T05:32:45+5:30
सर्वात दीर्घ भाषणात राष्ट्राध्यक्ष म्हणाले, आम्हाला अनेक देशांनी आतापर्यंत लुटले, आता चालणार नाही

डोनाल्ड ट्रम्पचा भारताला दणका; २ एप्रिलपासून जेवढ्यास-तेवढा टॅक्स आकारणार
न्यूयॉर्क/वॉशिंग्टन :भारत अमेरिकेतून येणाऱ्या गाड्यांवर १०० टक्के आयातशुक्ल (टॅरिफ) आकारतो, हे अतिशय अन्यायकारक आहे. भारत व चीनसह अन्य देश अमेरिकी वस्तूंवर जितके आयातशुल्क आकारतात त्याच प्रमाणात अमेरिका आता त्यांच्या वस्तूंवर २ एप्रिलपासून आयातशुल्क आकारणार आहे, अशी घोषणा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.
राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर अमेरिकी काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच केलेल्या भाषणात त्यांनी हे उद्गार काढले. ते म्हणाले की, गेली अनेक दशके या देशांनी अमेरिकी वस्तूंच्या विरोधात भरमसाठ आयातशुल्क आकारले. आता अशा देशांबद्दल अमेरिका तशीच पावले उचलणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, भारत, मॅक्सिको, कॅनडा, ब्राझील, चीन, युरोपीय समुदायातील देश यांनी अमेरिकेला अव्वाच्या सव्वा आयात शुल्क आकारले. ते देण्यात अमेरिकेने याआधी कधीकधी खळखळ केली नाही. मात्र, आता आम्ही या देशांबाबत जशास तसे धोरण स्वीकारले आहे. गेले दशकभर अमेरिकेला अनेक देशांनी लुटले असून, ते आता आम्ही सहन करणार नाही. जे देश आम्हाला त्यांच्या बाजारपेठेत सहजासहजी प्रवेश देणार नाहीत, त्यांच्याशी अमेरिकाही त्याच पद्धतीने वागविणार आहे.
ट्रम्प यांनी आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने जागतिक स्तरावर व्यापारक्षेत्रात संघर्ष होण्याची भीती वाढली आहे. अमेरिकेसोबत केलेल्या व्यापार कराराच्या चौकटीत आयात शुल्कवाढीच्या संकटावर काय तोडगा शोधता येईल याचा भारत विचार करत आहे.
भारताबद्दलचे ट्रम्प यांचे आक्षेप काय?
भारत हा टॅरिफ किंग, तसेच मोठा शोषक आहे, असे यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते. भारत अधिक प्रमाणात आयातशुल्क आकारतो. त्यामुळे त्याच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतो. पण, हे व्यवसाय करण्याची अजब पद्धत आहे. भारतात अमेरिकी वस्तूंची विक्री करणे खूप कठीण आहे. भारताने दोन्ही देशांमध्ये उत्तम व्यापार होण्यात काही अडथळे निर्माण केले आहेत. ट्रम्प यांनी सांगितले की, भारताबरोबरच्या व्यापारात अमेरिकेला १०० अब्ज डॉलरची तूट स्वीकारावी लागते. ते मला मान्य नाही. दोन्ही देशांनी समान अटींवर व्यापार करावा, असे आम्हाला वाटते. (वृत्तसंस्था)
अमेरिकेला युद्ध हवे असेल तर ते आम्ही शेवटपर्यंत लढू
बीजिंग : चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी एक निवेदन जारी करून म्हटले की, जर अमेरिकेला युद्ध हवे असेल तर युद्ध करू, मग ते व्यापार युद्ध असो वा अन्य कोणतेही युद्ध, आम्ही शेवटपर्यंत लढण्यास तयार आहोत.
संरक्षणासाठी कुणाची किती तरतूद?
अमेरिका ८९० अब्ज डॉलर्स
चीन २४९ अब्ज डॉलर्स
भारत ६,८१,२१० कोटी
संरक्षण बजेट वाढविले
चीनने बुधवारी आपल्या संरक्षण बजेटमध्ये ७.२ टक्के वाढीची घोषणा केली असून, ते संरक्षणासाठी तब्बल २४९ अब्ज डॉलर्स खर्च करणार आहेत.