अमेरिकेने आवळल्या चीनच्या मुसक्या! चीन, मेक्सिको आणि कॅनडावर लादले कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 08:21 IST2025-02-03T08:18:38+5:302025-02-03T08:21:08+5:30
donald trump tariffs on china News :राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे शुल्क ‘अमेरिकन लोकांच्या सुरक्षेसाठी’ आवश्यक आहे.

अमेरिकेने आवळल्या चीनच्या मुसक्या! चीन, मेक्सिको आणि कॅनडावर लादले कर
वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर २५ टक्के आणि चीनवर १० टक्के अतिरिक्त कर लादण्याची घोषणा केली. तसेच त्यांनी यात भारताला सहभागी केलेले नाही. गेल्या आठवड्यात फ्लोरिडा येथील एका कार्यक्रमात त्यांनी भारत, चीन आणि ब्राझील अशा देशांवर उच्च शुल्क लादण्याची धमकी दिली होती.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे शुल्क ‘अमेरिकन लोकांच्या सुरक्षेसाठी’ आवश्यक आहे. ट्रम्प यांनी तिन्ही देशांवर ‘फेंटानिल’चे बेकायदा उत्पादन आणि निर्यात रोखण्यासाठी आणि कॅनडा आणि मेक्सिकोवर अमेरिकेत बेकायदा स्थलांतर थांबवण्यासाठी दबाव आणला. मात्र, टॅरिफ असेच चालू राहिले तर महागाई लक्षणीयरीत्या वाढू शकते, ज्यामुळे अनेक मतदारांचा ट्रम्प यांच्यावर विश्वास राहणार नाही.
सर्व वस्तूंवरील करांत वाढ
ट्रम्प यांनी किराणा सामान, पेट्रोल, घरे, वाहने आणि इतर वस्तूंच्या किमती कमी करण्याचे आश्वासन दिले होते. यामुळे जागतिक अर्थव्यवस्था आणि ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या अवघ्या दोन आठवड्यात त्यांचा राजकीय जनादेश धोक्यात येण्याचा धोका आहे.
ट्रम्प यांनी आर्थिक आणीबाणीची घोषणा करत चीनमधून येणाऱ्या सर्व वस्तूंवर १० टक्के आणि मेक्सिको आणि कॅनडामधून येणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के कर लादला. कॅनडामधून आयात केलेल्या ऊर्जेवर, ज्यामध्ये तेल, नैसर्गिक वायू आणि वीज यांचा समावेश आहे.