डोनाल्ड ट्रम्प निलंबित करू शकतात एच-१ बी व्हिसा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 03:32 AM2020-06-13T03:32:25+5:302020-06-13T03:33:46+5:30
रोजगार संकटात : भारतीयांना मोठा फटका बसण्याची भीती
नवी दिल्ली : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एच-१ बी व्हिसासह सर्व रोजगार व्हिसा निलंबित करू शकतात, असे वृत्त ‘वॉल स्ट्रीट जरनल’ने दिले आहे. ट्रम्प यांच्या विचाराधीन असलेल्या प्रस्तावानुसार, जोपर्यंत निलंबन हटविले जाणार नाही, तोपर्यंत नव्याने एच-१ बी व्हिसा मिळालेल्या कोणाही अमेरिकेबाहेरील व्यक्तीला अमेरिकेत येता येणार नाही. सध्या अमेरिकेत असलेल्या व्हिसाधारकांवर मात्र या नियमाचा कोणताही परिणाम होणार नाही, असे या वृत्तात म्हटले आहे.
‘वॉल स्ट्रीट जरनल’ने म्हटले आहे की, कोरोना विषाणू महामारीच्या काळात कोणीही आजारी विदेशी नागरिक अमेरिकेत येता कामा नये, यासाठी ट्रम्प प्रशासन सर्व प्रकारचे रोजगार व्हिसा निलंबित करू इच्छित आहे. याशिवाय महामारीमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीच्या काळात विदेशी नागरिकांनी अमेरिकेत येऊन नोकऱ्या पटकावल्यास स्थानिक अमेरिकी नागरिकांतील बेरोजगारी आणखी वाढण्याची भीती ट्रम्प प्रशासनाला वाटते.
व्हाइट हाउसचे प्रवक्ते होगन गिडले यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकी श्रमिक आणि रोजगार इच्छुकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ट्रम्प प्रशासन बहुविध पर्यायांचा विचार करीत आहे. तथापि, अजून कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.
च्एच-१ बी हा विदेशी नागरिकांत सर्वाधिक लोकप्रिय असलेला अमेरिकी व्हिसा आहे. या व्हिसावर हजारो भारतीय आयटी व्यावसायिक दरवर्षी अमेरिकेत जात असतात.
च्अमेरिकी नागरिकांनाच प्रथम रोजगार मिळायला हवा, अशी ट्रम्प प्रशासनाची भूमिका आहे. त्याअनुषंगाने व्हिसा निलंबनाच्या निर्णयावर विचार केला जात आहे.
च्हा व्हिसा निलंबित करण्याच्या निर्णयाचा भारतीयांना म्हणूनच मोठा फटका बसणार आहे. कोरोना विषाणूमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हजारो एच-१ बी व्हिसाधारकांना आधीच नोकºया गमवाव्या लागल्या आहेत.