Confirmed : ओसामा बिन लादेनचा मुलगा हामजा ठार, ट्रम्प यांनी केले जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 07:29 PM2019-09-14T19:29:01+5:302019-09-14T19:31:03+5:30
अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला चढवणारा कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा मुलगा हामजा बिन लादेन ठार झाला आहे.
वॉशिंग्टन - अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला चढवणारा कुख्यात दहशतवादीओसामा बिन लादेनचा मुलगा हामजा बिन लादेन ठार झाला आहे. हामजा बिन लादेन ठार झाल्याच्या वृत्ताला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्म्प यांनी दुजोरा दिला आहे. हामजा बिन लादेन हा 31 जुलै रोजी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर झालेल्या दहशतवादीविरोधी चकमकीत ठार झाला.
US President Donald Trump confirms death of Al-Qaeda heir Hamza bin Laden: AFP News Agency pic.twitter.com/ueoKftwHq9
— ANI (@ANI) September 14, 2019
हामजा बिन लादेनचा मृत्यू झाल्याचे वृत्त सुमारे दीड महिन्यापूर्वी अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने दिले होते. मात्र अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने हमजाचा मृत्यू कुठे झाला याची माहिती दिली नव्हती. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनीही याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला होता. मात्र आज अखेरीस डोनाल्ड ट्रम्प यांनीच हामजा मारला गेल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.
वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हमजाकडून अमेरिकेवर हल्ला करण्याचे षडयंत्र रचण्यात येत होते. त्यामुळे अमेरिकेने हमजाचा पत्ता सांगणाऱ्याला 10 लाख डॉलर बक्षिस जाहीर केले होते. ओसामाचा मुलगा हमजा बिन लादेन दहशतवादी संघटनेत नव्याने उभा राहणारा चेहरा होता. जिहादचा युवराज म्हणून प्रसिद्ध असलेला हमजा वारंवार आपल्या राहण्याची ठिकाणे बदलत होता. अनेक वर्षांपासून अमेरिका त्यांच्या शोधात होती. पाकिस्तान, अफगाणिस्तान, सीरिया आणि इराण अशा विविध देशात तो फिरत होता.
काही दिवसांपूर्वी हमजाचे लग्नही झाले होते. त्याने ज्या मुलीशी लग्न केलं ती 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील विमान हायजॅक करणाऱ्या मोहम्मद अट्टा याची मुलगी आहे.
मे 2011 मध्ये पाकिस्तानच्या ऐबटाबादमध्ये लपून बसलेल्या अल-कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला अमेरिकेच्या सैन्यांनी ठार केलं होतं. अमेरिकेवर 9/11 ला झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या मागे क्रूर दहशतवादी लादेनचाच हात होता. यानंतर अमेरिकेने लादेनचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. जवळपास 10 वर्षानंतर ओसामा पाकिस्तानमधील एका घरात राहत असल्याचं समोर आलं होतं. 2 मे 2011 ला ओसामा बिन लादेनचा अमेरिकेच्या लष्कराने पाकिस्तानच्या ऐबटाबाद येथील त्याच्या घरात घुसून खात्मा केला होता. हे संपूर्ण ऑपरेशन अमेरिकेच्या नेव्ही सील कमांडोंनी यशस्वीरीत्या पार पाडले होते.