नवीन पक्ष स्थापन करण्यावरील चर्चांना डोनाल्ड ट्रम्प यांचे थेट उत्तर; म्हणाले...
By देवेश फडके | Published: March 1, 2021 01:35 PM2021-03-01T13:35:06+5:302021-03-01T13:42:59+5:30
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड (Donald Trump) ट्रम्प व्हाइट हाऊस सोडल्यानंतर प्रथमच सार्वजनिक स्वरुपात सर्वांसमोर आले. महाभियोगाच्या तपासातून मुक्तता झाल्यावर आठवडाभराने एका जाहीर कार्यक्रमाला डोनाल्ड ट्रम्प यांनी हजेरी लावली. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडन प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड (Donald Trump) ट्रम्प व्हाइट हाऊस सोडल्यानंतर प्रथमच सार्वजनिक स्वरुपात सर्वांसमोर आले. महाभियोगाच्या तपासातून मुक्तता झाल्यावर आठवडाभराने एका जाहीर कार्यक्रमाला डोनाल्ड ट्रम्प यांनी हजेरी लावली. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडन प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. (donald trump criticized joe biden over america first)
जो बायडन यांच्यावर टीका करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अमेरिका फर्स्ट धोरण आता अमेरिका लास्टपर्यंत येऊन पोहोचले आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला. चार वर्षांपूर्वी सुरू झालेला प्रवास अद्यापही संपलेला नाही. देशाचे भविष्य चांगले करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू. त्यावरच चर्चा होईल, असे ट्रम्प यांनी सांगितले.
नवीन पक्ष स्थापन करणार?
सभेला संबोधित करताना नवीन पक्ष स्थापन करण्याच्या चर्चांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कोणत्याही नवीन पक्षाची स्थापना केली जाणार नाही. असे केल्यास मतांचे विभाजन होईल आणि विजय संपादन करता येणार नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. या जाहीर कार्यक्रमात बहुतांश लोकांनी मास्क घातल्याचे दिसत होते.
२०२४ ला पुन्हा निवडणूक लढणार
डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२४ रोजी पुन्हा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. रिपब्लिकन पक्ष अधिक मजबूत होण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. आम्हीच निवडणूक जिंकलो होतो. मात्र, डेमोक्रेट्स पक्षाने फेरफार केला, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. जो बायडन सरकार काय करू शकेल, याचा अंदाज होता. मात्र, आताची प्रशासनाचे कामकाज पाहता, अमेरिकेची अवस्था इतकी वाईट होईल, अशी कल्पना केली नव्हती. बायडन सरकार अमेरिकेला मागे घेऊन जाईल, असे वाटले नव्हते, असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.