"ड्रिल बेबी ड्रिल"; शपथ घेताच डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, भारताला काय फायदा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 10:29 IST2025-01-21T10:27:26+5:302025-01-21T10:29:06+5:30
Drill, baby, drill: राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकाअधिक तेल आणि वायूचे उत्खनन करणार असल्याचे जाहीर केलं आहे.

"ड्रिल बेबी ड्रिल"; शपथ घेताच डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, भारताला काय फायदा?
Donald Trump:डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारी २०२५ रोजी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. यासह, त्यांनी अनेक खटले, दोन प्राणघातक हल्ल्यांचा सामना केल्यानंतर अमेरिकेच्या सत्तेत आश्चर्यकारक पुनरागमन केले. राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यांनतर भाषणामध्ये ट्रम्प यांनी २० जानेवारी २०२५ हा स्वातंत्र्य दिवस म्हणून जाहीर केला. यावेळी ट्रम्प यांनी राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर करणार असल्याचे म्हटलं. तसेच अमेरिकन ऊर्जा जगभरात निर्यात करण्याचे आश्वासन दिले. यासाठी अधिकाअधिक तेल आणि वायूचे उत्खनन करणार असल्याचे म्हणत ट्रम्प यांनी यावेळी ड्रिल बेबी ड्रिल अशी घोषणा दिली.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला अब्जाधीश, उद्योगपती, त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्षांसह इतर मान्यवर उपस्थित होते. पदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यासोबत अनेक मोठ्या घोषणा केल्या. भाषणाच्या काही मिनिटांमध्येच ट्रम्प यांनी तेल आणि वायू उत्खनन करण्याचा निर्धार जाहीर केला. अमेरिकेत राष्ट्रीय उर्जा आपत्कालीन स्थिती जाहीर केली आणि दर कमी करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी ड्रिल बेबी ड्रिल अशी घोषणा करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अतिरिक्त खर्च आणि इंधनाच्या किमती वाढल्यामुळे अमेरिकेत महागाई वाढल्याचे यावेळी ट्रम्प म्हणाले. विद्युत वाहनांच्या निर्मितीला चालना देणार असल्याचेही ट्रम्प यांनी यावेळी जाहीर केले. 'ड्रिल बेबी ड्रिल' ही डोनाल्ड ट्रम्प यांची निवडणुकीदरम्यानची सर्वात लोकप्रिय घोषणा आहे. या घोषणेद्वारे अमेरिकेत जीवाश्म इंधनाच्या उत्पादनाला प्रोत्साहन देऊन कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा अमेरिकेचा निर्णय बदलणार असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले होते.
महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय हवामान करारातून माघार घेण्याची आणि हरित ऊर्जेवर कमी खर्च करण्याची ट्रम्प यांची योजना आहे. त्यांनी देशातील इंधन ड्रिलिंगला गती देण्याचे आश्वासन दिले आहे. ट्रम्प जीवाश्म इंधनांना द्रव सोने म्हणतात.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
"अमेरिकेतील महागाईचे संकट हे प्रचंड खर्च आणि वाढत्या ऊर्जेच्या किमतींमुळे निर्माण झाले होते आणि म्हणूनच आज मी राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी देखील जाहीर करणार आहे. अमेरिका पुन्हा एकदा एक उत्पादक राष्ट्र बनेल आणि आपल्याकडे असे काहीतरी असेल जे इतर कोणत्याही उत्पादक राष्ट्राकडे कधीही नसेल. पृथ्वीवरील कोणत्याही देशापेक्षा जास्त प्रमाणात तेल आणि वायू आपल्याकडे असून आपण ते वापरणार आहोत. आपण पुन्हा एकदा श्रीमंत राष्ट्र होऊ आणि आपल्या पायाखालील ते द्रवरूप सोनेच ते करण्यास मदत करेल," असं ट्रम्प म्हणाले.
भारताला फायदा की तोटा?
जगातील कच्च्या तेलाचा तिसरा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या आणि गरजा पूर्ण करण्यासाठी आयातीवर अवलंबून असलेल्या भारतासाठी ही चांगली गोष्ट असेल. अमेरिका आधीच भारताला कच्च्या तेलाचा पाचवा सर्वात मोठा पुरवठादार आहे आणि अमेरिकेच्या तेल निर्यातीत वाढ झाल्यास भारताला आणखी फायदा होऊ शकतो. आयात केलेल्या कच्च्या तेलावरील मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसतो. ज्यामुळे देशाची व्यापार तूट, परकीय चलन साठा, रुपया दर आणि चलनवाढ यावरही परिणाम होतो.