डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 06:16 PM2024-11-06T18:16:41+5:302024-11-06T18:17:36+5:30

Donald Trump : अमेरिकेत पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार आले आहे.

Donald Trump : Donald Trump's victory mace on jobs? future of Indian software engineers is in the dark | डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात

Donald Trump : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. ट्रम्प यांनी त्यांची प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांना मोठ्या फरकाने पराभूत केले. येत्या जानेवारी महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा पार पडेल अन् बलाढ्य अमेरिकेची सूत्रे त्यांच्या हातात जातील. दरम्यान, आता एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. तो म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर संपूर्ण जगावर त्याचा काय परिणाम होईल? भारतातील आयटी उद्योगानेही डोनाल्ड ट्रम्प यांची धास्ती घेतली आहे. 

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळे भारतीयांवर काय परिणाम होईल, हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या मागील कार्यकाळातील निर्णयांकडे पाहावे लागेल. तसेच, यावेळी त्यांच्या निवडणूक प्रचारातील मुद्देही समजून घ्यावे लागतील. 

ट्रम्प यांचे इमिग्रेशन धोरण, H-1B व्हिसा आणि नोकऱ्या
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान इमिग्रेशन धोरणाबाबत आश्वासने दिली आहेत. त्यांनी H-1B व्हिसा कार्यक्रम मर्यादित ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याचा सर्वाधिक फटका भारतीयांना बसणार आहे. याचे कारण म्हणजे, या धोरणात बदल झाल्यास व्हिसा नाकारण्यापासून ते प्रक्रिया शुल्कापर्यंत सर्वच गोष्टी वाढतील. नोकरीसाठी H-1B व्हिसावर अमेरिकेत जाणाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसेल.

भारतीय आयटी व्यावसायिक अमेरिकेत काम करण्यासाठी या व्हिसावर अवलंबून असतात. याचा फायदा भारतीय आयटी कंपन्याही घेतात. आता ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाचा परिणाम भारतीय आयटी कंपन्यांपासून ते आयटी व्यावसायिकांपर्यंत सर्वांनाच होणार आहे. जेएम फायनान्शिअलच्या अहवालानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या यापूर्वीच्या कार्यकाळात त्यांनी ‘बाय अमेरिकन अँड हायर अमेरिकन’ असा आदेश पारित केला होता. यावेळीही त्यांच्या निवडणूक प्रचारात या मुद्द्यावर सातत्याने भर देण्यात आला आहे. त्यांच्या पहिल्या कार्यकाळातही H-1B व्हिसा मिळवण्यात अडचणी वाढल्या होत्या.

याच अहवालात असेही म्हटले आहे की, यावेळी कंपन्यांवर H-1B व्हिसाचा परिणाम मर्यादित असू शकतो, कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉर्पोरेट कर कमी करण्याचे संकेतही दिले आहेत. तो 21 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर येऊ शकतो. अशा परिस्थितीत, अमेरिकन कंपन्यांचा खर्च कमी होईल, ज्यामुळे ते बाहेरील लोकांना कामावर ठेवू शकतात.

भारतासाठी H-1B व्हिसा किती महत्त्वाचा आहे?
2022 मध्ये अमेरिकेने जारी केलेल्या H-1B व्हिसापैकी 72 टक्क्यांहून अधिक फक्त भारतीयांना देण्यात आले होते. H-1B व्हिसा भारतीयांना पदवी पूर्ण केल्यानंतरही अमेरिकेत काम करण्याची परवानगी देतो. इतकंच नाही, तर या व्हिसासह एकापेक्षा जास्त अमेरिकन एम्प्लॉयरसोबत कामही करता येते. याशिवाय, तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सोबत घेऊन अमेरिकेत जाण्याचे स्वातंत्र्य मिळते आणि कुटुंबातील सदस्यही तेथे काम करू शकतात. H-1B व्हिसावर दीर्घकाळ काम केल्यानंतर लोकांना अमेरिकेचे कायमचे नागरिकत्व मिळण्याची संधी मिळते. मात्र, आता दरवर्षी त्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे आणि त्यामुळे भारतीयांना एच-1 बी व्हिसाद्वारे ग्रीन कार्ड मिळण्याची प्रतीक्षा आणखी लांबली आहे.

Web Title: Donald Trump : Donald Trump's victory mace on jobs? future of Indian software engineers is in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.