डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एक नाही, तर तीन बंदुकांमधून गोळीबार; मोठी माहिती उघड...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 06:11 PM2024-07-15T18:11:22+5:302024-07-15T18:11:47+5:30
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे.
Donald Trump Firing : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प यांच्यावर एक नाही, तर तीन बंदुकीतून गोळीबार करण्यात आला आहे. म्हणजेच, घटनास्थळी एक नाही, तर तीन शूटर उपस्थित होते. या घटनेच्या ऑडिओ फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये दावा करण्यात येतोय की, ट्रम्प यांच्यावर तीन बंदुकांमधून गोळीबार करण्यात आला आहे. एका बंदुकीतून तीन, तर दुसऱ्या बंदुकीतून पाच गोळ्या झाडण्यात आल्या. तिसऱ्या बंदुकीतून सुटलेली गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला लागली.
गुप्तहेर खात्याने दुर्लक्ष केले
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याची चौकशी करण्यासाठी संसदीय समिती नेमण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात मिसुरीच्या सिनेटरने संसदीय समितीला पत्र लिहिले आहे. या हल्ल्याचा तपास जनतेसमोर व्हावा, असे त्यात म्हटले आहे. विशेष म्हणजे, ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यापूर्वी पोलिस हल्लेखोरापर्यंत गेल्याचेही समोर आले आहे. हल्लेखोराने पोलिसांकडे बंदूक रोखली होती, त्यामुळे पोलिसांची मागे हटावे लागले.
यानंतर पोलिसांनी तात्काळ या घटनेची माहिती गुप्तहेर खात्याला दिली. त्यांनी कारवाई करेपर्यंत हल्लेखोर थॉमस मॅथ्यूने ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला होता. हल्लेखोराबाबत वारंवार अलर्ट मिळूनही गुप्तहेर खात्याने त्याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे गुप्तचर यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांनी वेळीच कारवाई केली असती, तर ट्रम्प यांच्यावर गोळी झाडली नसती आणि इतर दोन लोकांचा मृत्यू झाला नसता.
त्या दिवशी नेमके काय घडले?
डोनाल्ड ट्रम्प शनिवारी पेनसिल्व्हेनियातील एका रॅलीला संबोधित करत होते. यावेळी अचानक त्यांच्यावर गोळीबार झाला. एक गोळी त्यांच्या कानाला लागली, तर इतर गोळ्या त्यांच्या दोन समर्थकांना लागल्या. या घटनेत ट्रम्प थोडक्यात बचावले, पण दोन समर्थकांचा मृत्यू झाला. गोळीबार करणाऱ्या थॉमस मॅथ्यू क्रुक्स (20) यालाही सुरक्षा रक्षकांनी तात्काळ ठार केले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.