'जो बायडेन यांच्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला', सहकाऱ्याचा गंभीर आरोप...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 02:42 PM2024-07-14T14:42:12+5:302024-07-14T14:43:14+5:30
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबाराची घटना घडली आहे.
Donald Trump Firing : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर पेनसिल्व्हेनिया येथील रॅलीत गोळीबार झाला. गोळी त्यांच्या कानाला लागून गेली, ज्यामुळे ट्रम्प थोडक्यात बचावले. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राजकारण चांगलेच तापले आहे. ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबारासाठी त्यांचे सहकारी जेडी व्हॅन्स यांनी थेट राष्ट्राध्यक्ष जो बाडेन (Joe Biden) यांना जबाबदार धरले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या पोस्टमध्ये जेडी व्हॅन्स म्हणाले, "आजची घटना सामान्य नाही. जो बायडेन आपल्या निवडणूक प्रचारात नेहमी, डोनाल्ड ट्रम्प हे एक हुकूमशाही फॅसिस्ट आहेत, ज्यांना कोणत्याही परिस्थितीत थांबवले पाहिजे, असे बोलत आहेत. यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा थेट प्रयत्न केला झाला आहे." दुसरीकडे, अमेरिकन खासदार माईक कॉलिन्स यांनीही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यावर हत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप दाखल करण्याची मागणी केली आहे.
Today is not just some isolated incident.
— J.D. Vance (@JDVance1) July 14, 2024
The central premise of the Biden campaign is that President Donald Trump is an authoritarian fascist who must be stopped at all costs.
That rhetoric led directly to President Trump's attempted assassination.
भाषणादरम्यान ट्रम्प यांच्यावर हल्ला
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प रविवारी पेनसिल्व्हेनिया येथे एका सभेला संबोधित करत होते. यावेळी अचानक त्यांच्यावर गोळीबार झाला. हल्लेखोराने ट्रम्प यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्या, ज्यातील एक त्यांच्या कानाला लागली. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या कानातून रक्तस्त्राव होताना स्पष्टपणे दिसत आहे. गोळीबार होताच सीक्रेट सर्व्हिसच्या एजंटांनी ट्रम्प यांना घेरले आणि त्यांना सुरक्षित स्थळी नेले.
हल्लेखोर जागीच ठार
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तरुणाला सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी जागीच ठार केले. थॉमस मॅथ्यू क्रुक्स, असे हल्लेखोराचे नाव होते. तो 20 वर्षांचा होता आणि पेनसिल्व्हेनियातील बेथेल पार्क येथे राहायचा. घटनास्थळावरून एक AR-15 सेमी ऑटोमॅटिक रायफल जप्त करण्यात आली आहे. याच रायफलने ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला आहे. या घटनेमुळे अमेरिकेतील राजकारण चांगलेच तापले आहे.
मोदींनी व्यक्त केलं दु:ख
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर चिंता व्यक्त केली आहे. मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या घटनेचा निषेध केला आहे. "माझे मित्र आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मी अत्यंत चिंतित आहे. मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. मृत आणि जखमींच्या कुटुंबियांसोबत आमच्या संवेदना आहेत," असं नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.