मी लोकशाहीसाठी गोळी झेलली; जो बायडेन देशासाठी धोका! डोनाल्ड ट्रम्प यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 02:37 PM2024-07-21T14:37:42+5:302024-07-21T14:38:13+5:30
Donald Trump Firing Incident : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गेल्या आठवड्यात जीवघेणा हल्ला झाला होता.
Donald Trump Firing Incident : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गेल्या आठवड्यात जीवघेणा हल्ला झाला होता. पेनसिल्व्हेनिया येथे एका निवडणूक रॅलीत त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात ट्रम्प यांचा जीव वाचला, पण त्यांच्या कानाला गोळी लागली. त्या घटनेच्या सुमारे आठवडाभरानंतर त्यांनी पुन्हा एका रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्यावरील हल्ल्याचा उल्लेख केला. 'मी देशाच्या लोकशाहीसाठी गोळी झेलली अन् जो बायडेन मला लोकशाहीसाठी धोका असल्याचे म्हणतात,' अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली.
देवाच्या कृपेने वाचलो
मिशिगनमधील रॅलीला संबोधित करताना ट्रम्प यांनी वारंवार हत्येच्या प्रयत्नाचा उल्लेख केला. ट्रम्प पुढे म्हणतात, 'देवाच्या कृपेने मी जीवंत आहे, अन्यथा मी आज तुमच्यात उभा नसतो. आठवडाभरापूर्वी माझ्या हत्येचा प्रयत्न झाला, त्या हल्ल्यातून मी थोडक्यात बचावलो, यासाठी देवाचे लाख लाख आभार. मला आशा आहे की, पुन्हा मला त्यातून जावे लागणार नाही. ती घटना खूप भयंकर होती, सुदैवाने गोळी कानाला लागली. गोळी थेट डोक्याला लागली असती, तर आज मी जीवंत नसतो', असेही ट्रम्प म्हणाले.
आम्ही नवीन युग सुरू करू
यापूर्वी रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले होते की, 'मी अर्ध्या अमेरिकेचा नाही, तर संपूर्ण अमेरिकेचा अध्यक्ष होण्याच्या शर्यतीत आहे. अर्धी अमेरिका जिंकून विजय मिळत नाही. आजपासून चार महिन्यांनी आपला मोठा विजय होईल. आम्ही सर्व धर्म, लोक आणि पंथांसाठी शांतता आणि समृद्धीच्या नवीन युगाची सुरुवात करू,' असा दावा ट्रम्प यांनी केला होता.
लोकशाही वाचवण्यासाठी परतणार - बायडेन
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सातत्याने ट्रम्प लोकशाहीसाठी धोका असल्याची टीका करत आहेत. बायडेन म्हणाले की, ट्रम्प यांच्याकडे अमेरिकेच्या चांगल्या भविष्यासाठी दृष्टी नाही. चार वर्षांपूर्वी लोकांनी त्यांना नाकारले होते. आगामी निवडणुकीत आम्ही त्यांचा नक्की पराभव करू,' अशी टीका त्यांनी केली होती.