"करार करा, नाहीतर याआधी पाहिली नाही अशी बॉम्बफेक करू"; ट्रम्प यांची इराणला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 11:29 IST2025-03-31T11:22:39+5:302025-03-31T11:29:53+5:30

इराणने अणुकरार मान्य न केल्यास बॉम्बफेक करण्याची धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

Donald Trump gave open threat to Iran on nuclear deal | "करार करा, नाहीतर याआधी पाहिली नाही अशी बॉम्बफेक करू"; ट्रम्प यांची इराणला धमकी

"करार करा, नाहीतर याआधी पाहिली नाही अशी बॉम्बफेक करू"; ट्रम्प यांची इराणला धमकी

Donald Trump Warn Iran:इराण आणि अमेरिकेतली संबंध सध्या चांगलेच ताणले गेले आहेत. दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अणुकरार मान्य न केल्यास बॉम्बफेक करण्याची धमकी दिली आहे. आण्विक कार्यक्रमाबाबत करार न केल्यास अमेरिका तुमच्यावर बॉम्बफेक करू शकते, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली. ट्रम्प यांनी इराणवर कठोर शुल्क लादण्याची धमकीही दिली. अमेरिकेने दिलेल्या धमकीवर आता इराणनेही प्रत्युत्तर दिलं आहे. इराणने आता अमेरिकेशी थेट चर्चा नाकारली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्राला इराणने ओमानमार्फत उत्तर पाठवले. या पत्रामध्ये त्यांनी अणुकरारावर भाष्य केलं होतं. ट्रम्प यांनी इराणला अणु करारासंदर्भात थेट चर्चेसाठी पत्र लिहिले होते. मात्र इराणच्या अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. इराणचे अध्यक्ष मसूद पझाकियान यांनी आम्ही अमेरिकेसोबत कोणताही थेट करार करणार नाही, असं सांगितले. त्यानंतर ट्रम्प यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना इराणवर बॉम्बफेक करण्याची धमकी दिली.

इराणला अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखण्याला ट्रम्प प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. मार्चच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांना पत्र लिहून आण्विक करारासाठी आमंत्रित केले असल्याचे सांगितले होते. १२ मार्च रोजी संयुक्त अरब अमिरातीमधून ते इराणला पाठवण्यात आले होते. जर इराण चर्चेत सहभागी झाला नाही तर तेहरानला अण्वस्त्रे बनवण्यापासून रोखण्यासाठी अमेरिका काहीही करेल, असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं.

त्यानंतर आता इराणने अमेरिकेशी करार न केल्यास त्यांच्यावर बॉम्बफेक करण्याची आणि अतिरिक्त शुल्क लादण्याची धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. "जर त्यांनी करार केला नाही तर इराणवर बॉम्बफेक होईल. ही अशी बॉम्बफेक असेल जी त्यांनी याआधी कधीही पाहिली नसेल," असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणनेही प्रत्युत्तर दिलं. जोपर्यंत अमेरिका त्यांचे दबावाचे धोरण बदलत नाही तोपर्यंत चर्चा अशक्य आहे, असं इराणने स्पष्ट केलं. ट्रम्प यांनी २०१८ मध्ये अमेरिकेला इराण आण्विक करारातून बाहेर काढल्यापासून, अप्रत्यक्ष चर्चा अयशस्वी ठरली आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणच्या लष्कराने आपली क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. इराणची सर्व क्षेपणास्त्रे भूमिगत क्षेपणास्त्र शहरात प्रक्षेपणासाठी तयार आहेत असं तेहरान टाइम्स म्हटलं आहे.

Web Title: Donald Trump gave open threat to Iran on nuclear deal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.