'त्या' विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द होणार! पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्यांना ट्रम्प सरकारचा मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 13:50 IST2025-01-30T13:49:31+5:302025-01-30T13:50:24+5:30
Donald Trump, Palestine Supporter students : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार आल्यापासून नवनवे आणि कठोर निर्णय घेतले जात आहेत.

'त्या' विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द होणार! पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्यांना ट्रम्प सरकारचा मोठा धक्का
Donald Trump, Palestine Supporter students : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार आल्यापासून नवनवे निर्णय घेतले जात आहेत. आता ट्रम्प सरकारने पॅलेस्टाईनचे समर्थन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दणका द्यायचे ठरवले आहे. ट्रम्प सरकार मोठी कारवाई करण्याच्या विचारात असून अमेरिकेतील सर्व 'पॅलेस्टाईन-हमास समर्थक' विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करणार आहे. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ज्यू लोकांविरोधातील भावनेचा सामना करण्यासाठी बुधवारी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करतील. या माध्यमातून पॅलेस्टाईनचे समर्थने करत निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या स्थलांतरित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि इतर परदेशी लोकांना हद्दपार करण्यास सुरुवात केली जाणार आहे.
ट्रम्प यांनी एका प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले की, जिहादी समर्थक निदर्शनास उपस्थित राहिलेल्या सर्व निवासी परदेशी लोकांना, आम्ही नोटीस दिली आहे. आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि आम्ही तुम्हाला अमेरिकेतून हद्दपार करू. ट्रम्प पुढे असेही म्हणाले की, हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धादरम्यान अमेरिकेत निदर्शने झाली होती. संस्थांच्या कट्टरतावादामुळे प्रभावित झालेल्या कॉलेज कॅम्पस मधील सर्व हमास समर्थक विद्यार्थ्यांचे व्हिसा मी तात्काळ रद्द करणार आहे.
हमासचे हल्ले आणि त्यानंतर गाझावरील इस्रायली हल्ल्यांमुळे युनायटेड स्टेट्समध्ये अनेक महिने पॅलेस्टाईन समर्थक निदर्शने करत होते. त्याचा परिणाम अमेरिकन कॉलेज कॅम्पसमध्येही दिसून आला होता. विद्यार्थ्यांनी इस्रायल आणि ज्यू लोकांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली होती आणि ज्यू विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याच्याही बातम्या आल्या होत्या. त्या सर्व गोष्टींची माहिती घेत आता ट्रम्प सरकारने कठोर निर्णय घेण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकले आहे.