प्रजासत्ताक दिनाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीबाबत साशंकता, अद्याप केला नाही निमंत्रणाचा स्वीकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 09:23 AM2018-08-02T09:23:08+5:302018-08-02T09:38:38+5:30
पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या सोहळ्यासाठी भारत सरकारने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रण पाठवलेले आहे. मात्र भारताच्या या निमंत्रणाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी सबुरीची भूमिका घेतली आहे.
वॉशिंग्टन - पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या सोहळ्यासाठी भारत सरकारने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रण पाठवलेले आहे. मात्र भारताच्या या निमंत्रणाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी सबुरीची भूमिका घेतली आहे. व्हाइट हाऊसच्या माध्यम प्रवक्त्या सारा सँडर्स यांनी सांगितले की ट्रम यांना भारत सरकारकडून अधिकृत निमंत्रण मिळाले आहे, मात्र त्यांनी भारत दौऱ्याबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही.
"अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भारत दौऱ्यासाठी निमंत्रण मिळाले आहे. मात्र राष्ट्राध्यक्षांनी या निमंत्रण स्वीकारण्याबातत अंतिम निर्णय घेतला आहे, असे मला वाटत नाही." असे सारा सँडर्स म्हणाल्या 2019 मध्ये होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून भारताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रित केले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेल्या निमंत्रणाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतान सँडर्स यांनी ही माहिती दिली. तसेच या निमंत्रणाबाबत 2+2 चर्चेमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या पुढील वर्षी होणाऱ्या दौऱ्यांबाबत चर्चा होईल असेही त्यांनी सांगितले.