ट्रम्प, ना घर का ना घाट का! महाभियोगामध्ये स्वकियांनीही साथ सोडली; पक्षही हाकलणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 08:01 AM2021-01-14T08:01:07+5:302021-01-14T08:01:39+5:30
Donald Trump impeachment News: अमेरिकेचे वादग्रस्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटेव्हजने स्वीकारला. महाभियोग चालवण्याच्या बाजूने २३२ तर महाभियोगाविरुद्ध १९७ जणांनी मतदान केले.
कोणे एके काळी जगातील सर्वात शक्तीमान नेता म्हणून हुंकार देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अवस्था आज अत्यंत केविलवाणी झाली आहे. अमेरिकेच्या संसदेवर समर्थकांनी केलेला हल्ला आणि त्यांना चिथावणी देणारे वक्तव्य ट्रम्प यांना नडले आहे. आज त्यांच्यावर दुसऱ्यांदा महाभियोग झेलण्याची नामुष्की ओढवली, त्याचबरोबर या महाभियोग प्रस्तावावर त्यांच्याच पक्षाच्या १० खासदारांनी ट्रम्प विरोधी मतदान केल्याने धक्का बसला आहे.
अमेरिकेचे वादग्रस्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटेव्हजने स्वीकारला. महाभियोग चालवण्याच्या बाजूने २३२ तर महाभियोगाविरुद्ध १९७ जणांनी मतदान केले. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या १० सदस्यांनीही महाभियोगाच्या बाजूने मतदान केले. चार जण तटस्थ राहिले. यामुळे अमेरिकेच्या इतिहासात दोनदा महाभियोग दाखल झालेले ट्रम्प हे एकमेव अध्यक्ष ठरले.
अमेरिकेत दुपारी साडेचारच्या दरम्यान (भारतीय वेळेनुसार पहाटे तीनच्या दरम्यान) हा प्रस्ताव मंजूर झाला. नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडन यांच्या शपथविधीस आणि सूत्रे हाती घेण्यास अवघा आठवडा राहिला असताना, हा निर्णय झाला आहे. आता पुढील प्रक्रिया सिनेटमध्ये चालेल. मागील बुधवारी शेकडो ट्रम्प समर्थकांनी कॅपिटोल इमारतीकडे कूच केल्याने हा अमेरिकन लोकशाहीच्या इतिहासातील काळा बुधवार ठरला होता. त्यानंतर या बुधवारी (ता. १३) ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्याचा निर्णय तेथील प्रतिनिधी सभागृहाने घेतला आहे.
या 10 रिपब्लिक खासदारांनी केले मतदान
- लिज़ चेनी (WY)
- अँथोनी गोंजालेज (OH)
- जेमी हेरेरा बेउटलर (WA)
- जॉन काटको (NY)
- अॅडम किंजिंगर (IL)
- पीटर मीजर (MI)
- डैन न्यूहाउस (WA)
- टॉम राइस (SC)
- फ्रेड अप्टन (MI)
- डेविड वलदो (CA)
आतापर्यंत अँड्रयू जॉनसन, बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधात महाभियोग आणण्यात आला आहे.
पक्षही करणार कारवाई
न्यू यॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार सीनेटमधील रिपब्लिकन पक्षाचे नेते मिच मॅकॉनेल यांनी सांगितले की, महाभियोग कारवाई पूर्ण झाल्यावर ट्रम्प यांना पक्षातून काढणे सोपे जाणार आहे.