PM मोदींसमोर डोनाल्ड ट्रम्प यांनी ठेवला चीनबद्दलचा प्रस्ताव, पण भारताने दिला नकार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 13:33 IST2025-02-14T13:31:06+5:302025-02-14T13:33:26+5:30
Narendra Modi Meets Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बैठक झाली. दोन्ही नेत्यांनी बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी ट्रम्प यांनी मोदींसमोर एक प्रस्ताव ठेवला होता.

PM मोदींसमोर डोनाल्ड ट्रम्प यांनी ठेवला चीनबद्दलचा प्रस्ताव, पण भारताने दिला नकार!
PM Modi Donald Trump: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात भारत-अमेरिकेशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा झाली. दोन्ही देशातील व्यापार दुप्पट करण्यावर जोर देतानाच इतर क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. याच बैठकीत अध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींसमोर एक प्रस्ताव ठेवला, ज्याला भारताने नकार दिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष ट्रम्प यांच्यात भारत-चीन सीमावादाच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. याबद्दल भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, अशा मुद्द्यावर भारताची दृष्टिकोण नेहमी द्विपक्षीय राहिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ट्रम्प यांनी चीनसंदर्भातील प्रस्ताव ठेवला. "मी भारताकडे बघतो. भारत-चीन सीमेवर भयंकर चकमकी बघायला मिळतात आणि मला असे वाटते की असेच चालत राहील. हे सगळे थांबवण्यासाठी जर मी काही मदत करू शकलो, तर मला खूप आनंद होईल. हे खूप काळापासून चालू आहे, जे खूपच हिंसक आहे."
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा प्रस्ताव भारताने फेटाळून लावला. भारताचे परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले की, यासंदर्भात भारताची भूमिका द्विपक्षीयच राहिलेली आहे.
"आमचे कोणत्याही शेजारी राष्ट्रासोबत जे काही मुद्दे आहेत, ते आम्ही द्विपक्षीय चर्चेतून सोडवू", असे विक्रम मिस्त्री यांनी स्पष्ट केले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी दिला होता प्रस्ताव
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी या मुद्द्यावर मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव देण्याची ही पहिलीच वेळ नाही. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान या दोन्ही सीमावादाच्या मुद्द्यावर मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला होता.
डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन आणि रशियातील युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर गाझा पट्टीत सुरू असलेला इस्रायल-हमास संघर्ष थांबवण्यातही मध्यस्थी केली आहे. त्यानंतर आता ट्रम्प यांनी भारत-चीन सीमावादात मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.