डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी पुन्हा दिला मध्यस्थीचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 10:24 AM2019-08-21T10:24:42+5:302019-08-21T10:36:16+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीरप्रश्नी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. काश्मीरमधील हिंदू-मुस्लीम संबंधांबाबत भाष्य करत ट्रम्प यांनी या आठवड्यात मोदींशी होणाऱ्या बैठकीमध्ये काश्मीरप्रश्नी चर्चा करून असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. या आठवड्याच्या शेवटी जी-7 देशांच्या प्रमुखांची बैठक फ्रान्समध्ये होणार आहे. त्यावेळी नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीसुद्धा काश्मीरप्रश्नी मध्यस्थीचा प्रस्ताव दिला होता. मात्र भारताने काश्मीर प्रश्न हा द्विपक्षीय मुद्दा असल्याचे सांगत हा प्रस्ताव फेटाळून लावला होता.
#WATCH Washington DC:US President Donald Trump reacts on Kashmir issue, says "...There are tremendous problems between those 2 countries. I'll do the best I can to mediate or do something. Great relationship with both of them. But they aren't exactly friends at this moment"(20.8) pic.twitter.com/DiZrn4u5Mq
— ANI (@ANI) August 21, 2019
वॉशिंग्टन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले की, ''काश्मीर प्रश्न हा खूप गुंतागुंतीचा आहे. इथे हिंदू आणि मुस्लिम समुदायांचे वास्तव्य आहे. मात्र त्यांच्यात सौहार्दाचे वातावरण आहे, असे मला वाटत नाही. काश्मीरप्रश्नी मध्यस्थीसाठी जे काही उत्तम असेल ते मी करेन.'' काही दिवसांपूर्वी इम्रान खानशी झालेल्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींनी आपल्याला काश्मीरबाबत मध्यस्थी करण्याची विनंती केल्याचा दावा केला होता.'' मात्र व्हाइट हाऊसने नंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याचे खंडन केले होते. तसेच भारतानेही काश्मीरप्रश्नी कुठल्याही तिसऱ्या देशाची मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही, हे स्पष्ट केले आहे. त्यानंतरही आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मध्यस्थीचा प्रस्ताव दिला आहे.
दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर प्रश्नावर भारताविरुद्ध सांभाळून, मर्यादेत बोलावे, असा सल्ला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इम्रान खान यांना दिला आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी फोनवरून चर्चा केली. कठीण परिस्थितीपासून वाचण्यासाठी दोन्ही देशांनी संयम बाळगावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात सोमवारी ३० मिनिटे फोनवरून चर्चा झाली. त्यानंतर ट्रम्प यांनी इम्रान खान यांच्याशी चर्चा केली. फोनवरील चर्चेदरम्यान मोदी यांनी ट्रम्प यांना हे निदर्शनास आणून दिले होते की, पाकिस्तानचे नेते भारताविरुद्ध चिथावणीखोर विधाने करीत आहेत.
व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी इम्रान खान यांच्याशी फोनवरून चर्चा केली. काश्मीरबाबत विधाने करताना संयम बाळगण्यास सांगितले. काश्मीर प्रश्नावर भारताविरुद्ध आपली मोहीम सुरू ठेवताना इम्रान खान रविवारी असे म्हणाले होते की, भारत सरकार हे हुकूमशाही आणि वर्चस्ववादी आहे. तसेच, पाकिस्तान आणि भारतातील अल्पसंख्याकांसाठी हा धोका आहे. भारताच्या अण्वस्त्र सुरक्षेबाबत जगाने विचार करायला हवा, कारण त्याचा जगावर परिणाम होणार आहे.