भारतासाठी चांगली बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचे नवीन NSA माईक वॉल्ट्झ, चीनचे कट्टर टीकाकार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 09:03 AM2024-11-12T09:03:00+5:302024-11-12T09:04:24+5:30
Mike Waltz : डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन खासदार माईक वॉल्ट्झ यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून निवड केली आहे.
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्यानंतर आपली नवीन टीम तयार करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प पुढील वर्षी जानेवारी महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहे. मात्र, याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी एकामागून एक मोठ्या पदांसाठी लोकांची निवड करण्यास सुरुवात केली आहे.
या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन खासदार माईक वॉल्ट्झ यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून निवड केली आहे. माईक वॉल्ट्झ हे चीनचे कट्टर टीकाकार मानले जातात. तसेच, अमेरिकेच्या सिनेटमधील इंडिया कॉकसचे प्रमुख माईक वॉल्ट्झ हे अमेरिकेसाठी मजबूत संरक्षण धोरणाचे समर्थन करतात. देशाची सुरक्षा आणखी बळकट करण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या आश्वासनांचे ते खंबीर समर्थक आहेत.
रशिया-युक्रेन युद्ध आणि मध्यपूर्वेतील दीर्घकाळ चाललेल्या युद्धात माईक वॉल्ट्झ महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. माईक वॉल्ट्झ यांनी 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कॅपिटल हिल येथे ऐतिहासिक भाषण आयोजित करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान, सिनेटच्या इंडिया कॉकसमध्ये एकूण ४० सदस्य आहेत. २००४ मध्ये न्यूयॉर्कच्या तत्कालीन सिनेटर हिलरी क्लिंटन आणि सिनेटर जॉन कॉर्निन यांनी इंडिया कॉकसची स्थापना केली होती. हे सिनेटमधील सर्वात मोठे कॉकस आहे.
कोण आहेत माईक वॉल्ट्झ?
५० वर्षीय माईक वॉल्ट्झ हे आर्मी नॅशनल गार्डचे निवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी तीन वेळा फ्लोरिडाचे संसदेत प्रतिनिधित्व केले आहे. ते सदन सशस्त्र सेवा उपसमितीचे अध्यक्ष राहिले आहेत. तसेच, माईक वॉल्ट्झ हे सभागृहाच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे सदस्यही राहिले आहेत. याशिवाय, माईक वॉल्ट्झ यांना लष्कराचा व्यापक अनुभव आहे. त्यांनी व्हर्जिनिया मिलिटरी इन्स्टिट्यूटमधून पदवी प्राप्त केली आणि फ्लोरिडा गार्डमध्ये सामील होण्यापूर्वी चार वर्षे सैन्यात सेवा केली. ते अफगाणिस्तान, मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील युद्धात सामील झाले होते. तसेच, त्यांनी पेंटागॉनमध्ये धोरण सल्लागार म्हणूनही काम केले आहे.