Donald Trump Porn Star Case : पॉर्न स्टार प्रकरणावरील सुनावणी संपली, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ज्युरीनं लावले 34 आरोप, दंडही भरावा लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 02:20 AM2023-04-05T02:20:54+5:302023-04-05T02:22:47+5:30
ज्युरीने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तब्बल 34 आरोप लावले. यावर, ट्रम्प यांनी न्यायालयासमोर आपण निर्दोष असल्याचे सांगितले.
न्यूयॉर्क - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्टॉर्मी डॅनियल्स प्रकरणात मॅनहॅटन कोर्टात हजर झाले होते. ट्रम्प न्यायालयात पोहोचताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर, ग्रँड ज्युरीच्या आरोपांचे न्यायालयात वाचन करण्यात आले. ज्युरीने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तब्बल 34 आरोप लावले. यावर, ट्रम्प यांनी न्यायालयासमोर आपण निर्दोष असल्याचे सांगितले. यावेळी न्यायालयाने ट्रम्प यांना 1.22 लाख डॉलरचा दंड ठोठावला आहे. याच बरोबर, डोनाल्ड ट्रम्प हे गुन्हेगारी आरोपांना सामोरे जाणारे अमेरिकेचे पहिलेच राष्ट्रपती ठरले आहेत.
न्यूयॉर्कच्या ग्रँड ज्युरीने ट्रम्प यांच्यावर आरोप लावण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांनी लावलेले आरोप अद्याप सार्वजनिक केलेले नाहीत. त्यामुळे, डिस्ट्रिक अटॉर्नींसमोर ट्रम्प यांच्या विरोधात काय काय आरोप करण्यात आले? यासंदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. आरोप असलेले सीलबंद पाकीट आज औपचारिकपणे न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण? -
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच, 2016 मध्ये पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला 130,000 डॉलर दिल्याबद्दल अटक होण्याची शक्यता व्यक्त केली होती. खरे तर हे प्रकरण 2006 चे आहे. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सने 2011 मध्ये 'इन टच वीकली'ला दिलेल्या मुलाखतीत आरोप केला होता की, डोनाल्ड ट्रम्प यांनी तिला डिनरसाठी आमंत्रित केले होते आणि ती त्यांना भेटण्यासाठी हॉटेलच्या एका खोलीत गेली होती. ही मुलाखत 2011 मध्येच देण्यात आली होती, पण ती ट्रम्प राष्ट्रपती झाल्यानंतर 2018 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती.
तत्पूर्वी, ट्रम्प पोहोचण्यापूर्वीच न्यायालयाबाहेर आणि आतही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. ट्रम्प आठ गाड्यांच्या ताफ्यासह न्यायालयाच्या परिसरात पोहोचले. न्यायालयात हजर होण्यापूर्वी ट्रम्प मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अॅटर्नीच्या कार्यालयात पोहोचले तेथे पोलिसांनी त्यांना अटक केली.