काश्मीरवर डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा मध्यस्थीचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 02:14 AM2019-09-27T02:14:21+5:302019-09-27T02:14:48+5:30
एक दिवसापूर्वीच ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली होती.
न्यूयॉर्क : काश्मीरच्या मुद्यावर मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव भारत आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाकडे मांडला आहे, अशी माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. एक दिवसापूर्वीच ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली होती. पाकिस्तानकडून निर्माण होणाऱ्या दहशतवादाचा धोका आणि भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापारसंबंधी प्रकरणांवर मुख्य स्वरूपात लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
भारताचे असे मत होते की, काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय प्रकरण आहे. एखाद्या तिसºया पक्षाची यात भूमिका असू शकत नाही. भारताने ५ आॅगस्ट रोजी काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केला होता. तेव्हापासून पाकिस्तान या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे; पण भारताचे स्पष्ट मत आहे की, कलम ३७० हटविणे हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केलेले आहे की, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या दरम्यान भारत आणि पाकच्या नेत्यांसोबत यशस्वी चर्चा झाली. ट्रम्प यांनी चौथ्यांदा मध्यस्थतेचा प्रस्ताव देताना म्हटले, काश्मीर मुद्यावर मध्यस्थतेसह सर्व प्रकारची मदत करण्याची आपली तयारी आहे. दोन्ही देशांचे नेतृत्व करणारे नेते माझे मित्र आहेत. दोन्हीही अण्वस्त्र सज्ज देश आहेत. त्यांना यावर तोडगा काढावाच लागेल.
भारत भूमिकेवर ठाम
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे की, भारताची भूमिका स्पष्ट आहे. मला असे वाटते की, परराष्ट्र सचिवांनी यावर स्पष्टीकरण दिले.
परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी मोदी-ट्रम्प यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की, पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे की, आम्ही पाकिस्तानसोबत चर्चा करण्यास संकोच करत नाहीत; पण पाकिस्तानने त्यासाठी काही ठोस पावले उचलावीत.
काश्मीर मुद्यावर तिसºया पक्षाची मध्यस्थी घेण्याची प्रश्नच नाही, असे मत भारताने यापूर्वी अनेकदा व्यक्त केले आहे.