अमेरिकन नागरिकांचं नशीब पालटणार, खिशात पैसा वाढणार; ट्रम्प घेणार ऐतिहासिक निर्णय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 17:33 IST2025-01-29T17:32:58+5:302025-01-29T17:33:47+5:30
जर ट्रम्प हा प्रस्ताव लागू करतील तर त्याचा परिणाम केवळ अमेरिकेपर्यंत मर्यादित राहणार नाही. भारतासह अन्य देशांनाही या नव्या आव्हानांचा सामना करावा लागेल.

अमेरिकन नागरिकांचं नशीब पालटणार, खिशात पैसा वाढणार; ट्रम्प घेणार ऐतिहासिक निर्णय?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असं विधान केले आहे जे ऐकून जगातील बहुतांश देश हैराण झालेत. एकीकडे दुसऱ्या देशांवर १०० टक्के टॅरिफ लावणारे ट्रम्प आता त्यांच्या देशात इन्कम टॅक्स व्यवस्था संपवण्याची भाषा करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच एक मुलाखत दिली. त्यात अमेरिकेतली इन्कम टॅक्स व्यवस्था संपुष्टात आणण्याचं विधान केले. ट्रम्प यांच्या या पाऊलाने अमेरिकन नागरिकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार असून ते आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होतील.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
रिपब्लिकन इश्यूज कॉन्फरन्समध्ये ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेत १९१३ आधी कुठलाही इन्कम टॅक्स नव्हता आणि त्याकाळी देशाने टॅरिफच्या माध्यमातून आर्थिक प्रगती केली होती. १८७० ते १९१३ या काळात अमेरिकेने सर्वाधिक श्रीमंतीचा अनुभव घेतला होता, जेव्हा टॅरिफवर आधारित अर्थव्यवस्था लागू होती. आता ही वेळ आलीय अमेरिकेची ती सिस्टम पुन्हा आणून देशाला ताकदवान बनवलं जाईल असंही ट्रम्प यांनी सांगितले.
त्याशिवाय परदेशी उत्पादनावर टॅरिफ वाढवून अमेरिकेला आपली आर्थिक क्षमता मजबूत करावी लागेल. आमच्या सरकारचं लक्ष्य आपल्याच नागरिकांवर टॅक्स लावून परदेशी राष्ट्रांना मजबूत करणे नाही. त्याव्यतिरिक्त परदेशी वस्तूंवर शुल्क लावून अमेरिकन नागरिकांना समृद्ध करणे असेल असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
काय होणार परिणाम?
एकीकडे अमेरिकन नागरिकांमध्ये ट्रम्प यांच्या या प्रस्तावाचं कौतुक होताना दिसतंय तर दुसरीकडे काही तज्ज्ञांनी वेगळी शंका उपस्थित केली आहे. ही योजना जितकी सरळ दिसते तितकी नाही. टॅरिफ आणि कर कपातीमुळे आर्थिक धोरणांवर परिणाम होईल. व्याजदर वाढू शकतात त्याशिवाय परदेशी वस्तूंवरील शुल्क वाढल्याने महागाई दरही वाढू शकतो जे शेवटी अमेरिकन ग्राहकांवरच दबाव पडेल असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, जर ट्रम्प हा प्रस्ताव लागू करतील तर त्याचा परिणाम केवळ अमेरिकेपर्यंत मर्यादित राहणार नाही. भारतासह अन्य देशांनाही या नव्या आव्हानांचा सामना करावा लागेल. जास्त शुल्कामुळे भारतीय निर्यातदारांचे नुकसान होईल. विशेषत: आयटी सेवा, गारमेट्स, फार्मास्यूटिकल्स सारख्या क्षेत्रांवर गंभीर परिणाम पाहायला मिळू शकतात. त्याशिवाय जर भारतानेही पलटवार म्हणून अमेरिकन उत्पादनावर टॅरिफ वाढवले तर त्यातून स्थानिक बाजारात महागाई वाढू शकते असं अर्थ विश्लेषकांनी सांगितले आहे.