Donald Trump, US Election 2024: "...म्हणून हल्लेखोराचा नेम चुकला अन् देवाने मला वाचवलं"; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 11:45 AM2024-09-03T11:45:16+5:302024-09-03T11:48:41+5:30
Donald Trump on Attack Survival: रॅलीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यात गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली होती
Donald Trump on Attack Survival: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी पेनसिल्व्हेनियामध्ये आपल्यावर झालेल्या हल्ल्याबाबत मोठे विधान केले. त्या हल्ल्यानंतर मी जास्त धार्मिक झालो आहे. देवाने मला एका खास कारणासाठी वाचवल्यासारखे वाटते आहे, असा दावा त्यांनी केला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प फॉक्स न्यूजच्या लाईफ लिबर्टी अँड लेविन या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले आणि अनेक दावेही केले.
शोचे होस्ट मार्क लेविन यांच्याशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले, "देवाने मला वाचवले आहे जेणेकरून ते अमेरिकेच्या विकासात आणखी जास्त योगदान देऊ शकेन. अमेरिकेला अधिक मजबूत करू शकेन. कारण सध्या आपला देश खूप कमकुवत आणि विखुरलेला आहे." या शोमध्ये बोलत असताना तो धार्मिक गोष्टींवर भरभरून बोलले. याआधीही ट्रम्प यांनी दावा केला होती की, देवाने त्यांचा जीव वाचवला आहे. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले होते की, आज मी फक्त देवामुळेच जिवंत आहे. मात्र त्यामागे 'देवाला माझ्या हातून अमेरिकेचा विकास हवा असेल', हा दावा त्यांनी नव्यानेच केला.
हल्लेखोराचा नेम का चुकला?
शोमध्ये ट्रम्प यांनी त्यांच्यावरील हल्ल्याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात ते देखील शेअर केले. ते म्हणाले की तुम्ही कोणत्याही तज्ज्ञाशी बोललात तर ते म्हणतील की माझ्या जगण्याची शक्यता नव्हती, परंतु मला वाटते की हल्लेखोर घाईघाईत होता. त्यामुळे तो चुकला. ट्रम्प यांनी सीक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांचेही कौतुक केले आणि सांगितले की जर त्यांनी त्वरित कारवाई केली नसती तर हा हल्ला लास वेगासमधील घटनेसारखा झाला मोठा असता, त्या हल्ल्यात एका माथेफिरूने आपल्या घराच्या छतावर उभे राहून जमावावर अंदाधुंद गोळीबार केला होता.