अमेरिकन बाइकवर भारताकडून 100 % टॅक्सवसुली, आम्हाला मूर्ख समजलात काय?, ट्रम्प यांचा मोदींना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 10:34 AM2019-06-11T10:34:02+5:302019-06-11T10:34:24+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला लक्ष्य केलं आहे.
वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला लक्ष्य केलं आहे. भारत अमेरिकेच्या मोटारसायकलवर 100 टक्के आयात शुल्क आकारत होता. आता त्यांनी तो 50 टक्के केला असला तरी जास्तच आहे. आमच्यासाठी हे स्वीकारार्ह नाही, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.
सीबीएस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी भारतावर आगपाखड केली आहे. अमेरिकाला आता आणखी मूर्ख बनवता येणार नाही. आमचा देश मूर्ख नाही. जेणेकरून त्याला फसवलं जाईल. भारत आमचा मित्र देश आहे. मोदी तुम्ही आमच्या मोटारसायकलवर 100 टक्के कर लावलात. आम्ही तुमच्याकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारत नाही. ट्रम्प यांनी हार्ले डेव्हिडसन या बाइकवर लावल्यात येणाऱ्या आयात शुल्कासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. भारतानं यावर लावलेला आयात शुल्क शून्य करायला हवा, अशी ट्रम्प यांची अपेक्षा आहे. अमेरिकेची मोटारसायकल जेव्हा भारतात जाते तेव्हा त्यावर 100 टक्के कर लावला जातो. परंतु भारताची मोटारसायकल अमेरिकेत विक्रीसाठी आणल्यास कोणताही कर आकारला जात नाही. यासंदर्भात मी मोदींशी चर्चा करणार असून, हे स्वीकारार्ह नसल्याचं स्पष्ट शब्दात सांगणार असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.
पुढे ट्रम्प म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन कॉल केल्यानंतर त्यांनी 100 टक्क्यांवरचा आयात शुल्क 50 टक्क्यांवर आणलं. परंतु तेसुद्धा मला स्वीकार नाही. त्या मोटारसायकलवरचं आयात शुल्क पूर्णतः हटवलं गेलं पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. अमेरिका आणि भारतादरम्यान बाइकवर लावण्यात येणारं आयात शुल्क कमी करण्याच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. अमेरिका ही काही बँक नाही. प्रत्येक जण या बँकेला लुटण्याचा प्रयत्न करतोय आणि हे बऱ्याच काळापासून होत आलं आहे. अमेरिकेचा इतर देशांबरोबर असलेला व्यापार तोट्यात आहे.