डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 11:46 AM2024-11-06T11:46:16+5:302024-11-06T11:48:57+5:30
Donald Trump vs Kamala Harris, US Presidential Election 2024: ट्रम्प २३० जागांवर आघाडीवर आहेत तर कमला हॅरिस हळूहळू आगेकूच करत २१० जागांपर्यंत पोहोचल्या आहेत
Donald Trump vs Kamala Harris, US Presidential Election 2024: अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्या विरोधात मोठी आघाडी घेतली. ट्रम्प २३० जागांवर आघाडीवर आहेत तर कमला हॅरिस हळूहळू आगेकूच करत २१० जागांपर्यंत पोहोचल्या आहेत. अमेरिकेतील (America) अनेक राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प विजयी होण्याचा अंदाज आहे. निवडणुकीचे अंतिम निकाल यायला वेळ लागणार असला तरी, आश्चर्याची बाब म्हणजे ट्रम्प यांच्या आघाडीत ग्रामीण अमेरिकन विभागांचा मोठा वाटा असल्याचे दिसून आले आहे.
कमला हॅरिस यांच्या कामगिरीत सुधारणा नाही
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलिना या राज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प जिंकतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. याचे प्रमुख कारण म्हणजे २०२०च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या तुलनेत पारंपारिक ग्रामीण भागात ट्रम्प यांची यंदाची कामगिरी खूपच चांगली दिसत होती. कमला हॅरिस यांनी शहरी आणि उपनगरीय काउंटींमध्ये सरासरी मते घेत, बायडेन यांच्याच पावलावर पाऊल ठेवले आहे. तर २०२०च्या कामगिरीच्या तुलनेत यंदा या भागात कमला हॅरिस यांच्या पक्षाने कोणतीही लक्षणीय सुधारणा केलेली नाही. यामुळे त्यांचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.
४० राज्यांचे निकाल हाती, ट्रम्प यांची आघाडी कायम
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील ५० पैकी आता केवळ १० राज्यांमध्ये मतमोजणी बाकी आहे. आतापर्यंत ४० राज्यांचे निकाल आले आहेत. यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प २५ तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस १५ जागांवर विजयी झाले आहेत. ट्रम्प हे बहुमतापासून अवघ्या ४० जागा दूर आहेत. त्यांना ५३८ जागांपैकी २३० जागा मिळाल्या आहेत. तर कमला यांना २१० जागा मिळाल्या आहेत. दोघांमधील फरक केवळ २० जागांचा आहे. मात्र, उर्वरित १० पैकी ५ राज्यांमध्ये ट्रम्प आघाडीवर आहेत. तर २ मध्ये अद्याप मतमोजणी सुरू झालेली नाही. त्यामुळे चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या या लढतीत कमला हॅरिस सध्या पराभवाच्या छायेत आहेत.