ट्रम्प समर्थकांचा राडा, अमेरिकी संसद धरली चार तास वेठीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 06:34 AM2021-01-08T06:34:16+5:302021-01-08T06:34:56+5:30
Donald Trump: हिंसाचारात चार जण ठार तर अनेक जण जखमी; १२ जणांना अटक
वॉशिंग्टन : जगातील सगळ्यात जुनी लोकशाही असा लौकिक असलेल्या अमेरिकी लोकशाहीसाठी बुधवारचा दिवस सर्वांत काळाकुट्ट ठरला. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांच्याकडे आता अमेरिकीची सूत्रे जाणार, हे स्पष्ट होताच शेकडो ट्रम्प समर्थकांनी थेट अमेरिकी संसदेवरच हल्ला चढवला. कॅपिटॉल हिल परिसरातील संसद इमारतीत घुसून ट्रम्प समर्थकांनी कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या हिंसाचारात चार जण ठार तर अनेक जण जखमी झाले. आंदोलकांनी चार तास संसद वेठीस धरली होती.
अमेरिकी संसदेत बुधवारी मतदारवृंदाच्या मतांची मोजणी सुरू होती. या घटनात्मक प्रक्रियेत बायडेन यांच्या विजयाची औपचारिकता बाकी होती. मात्र, मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना ट्रम्पसमर्थकांनी संसद परिसरात गोळा होण्यास सुरुवात केली. वाढलेल्या गर्दीने एका क्षणी संसदेभोवतालचे सुरक्षा कडे तोडत संसदेच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. या तणावाच्या वातावरणात पोलीस बंदोबस्तही तोकडा पडला.
ट्रम्प यांचे आधी समर्थन नंतर आवाहन
संसद परिसरात जसजशी आपल्या समर्थकांची गर्दी होऊ लागली तसतसा मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात उत्साह संचारला. त्यांनी अधिक संख्येने लोकांनी यावे, असे आवाहन केले.
मात्र, समर्थकांनी हिंसाचार करण्यास सुरुवात
करताच ट्रम्प यांनी ‘या निवडणुकीत निश्चितच घोटाळा झाला आहे. परंतु तुम्ही त्यांच्या हातचे बाहुले होऊ नका. शांतता राखा आणि घरी जा,’ असे आवाहन समर्थकांना केले.
ट्रम्प यांनी समर्थकांना चेतविण्यासाठी आपल्या व्यासपीठाचा वापर केल्याबद्दल ट्विटर आणि फेसबुक यांनी अनुक्रमे १२ आणि २४ तासांसाठी ट्रम्प यांचे अकाउंट निलंबित केले.
अध्यक्षपदावर बायडेन
n ट्रम्प समर्थकांनी केलेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर अमेरिकी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन शांततेत पार पडले. गुरुवारी पहाटेपर्यंत हे कामकाज सुरू होते. यावेळी जो बायडेन यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
n आता २० जानेवारी रोजी बायडेन अध्यक्षपदाची शपथ घेतील तर कमला हॅरिस अमेरिकी इतिहासातील पहिल्या महिला उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील.
लोकशाही अमेरिकेत असा काळाकुट्ट क्षण येऊन ठेपला हे पाहणे अतीव दु:खदायक आहे. आमच्या लोकशाहीवर अभूतपूर्व असा हल्ला झाला आहे. परंतु कॅपिटॉल हिल परिसरातील दृश्य ही खरी अमेरिका नाही. हे आता संपायला हवे.
- जो बायडेन,
नवनिर्वाचित अध्यक्ष