सहा किलो वजन कमी करणार, चीजबर्गरचा मोह टाळणार- ट्रम्प
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 02:47 PM2018-05-31T14:47:23+5:302018-05-31T14:47:23+5:30
71 वर्षांचे ट्रम्प विविध कारणांनी सतत चर्चेत असतात, आता ते नव्या विषयामुळे चर्चेत आले आहेत.
वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विविध कारणांनी सतत चर्चेत असतात. वेगवेगळे ट्वीट्स, त्यांनी मांडलेली विविध मते यापासून त्यांच्या कपड्यांपर्यंत आणि केशभूषेपर्यंत त्यांच्यावर टीका होत असते. ट्वीटरवरही लोक त्यांच्यावर तुटून पडतात. मात्र आता ट्रम्प त्यांच्या वजनामुळे चर्चेमध्ये आले आहेत. ट्रम्प यांनी सहा किलो वजन कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. ट्रम्प 71 वर्षांचे आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या आहारतज्ज्ञ सल्लागाराने वजन कमी करण्यासाठी काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार ट्रम्प यांना चीजबर्गर खाणे सोडावे लागणार आहे. तसेच आहारामध्ये भाज्यांचा समावेशही करण्याची सूचना केली आहे. जानेवारी महिन्यातच ट्रम्प यांनी सहा किलो वजन कमी करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. आता ट्रम्प यांनी आपल्या व्यायामाचे नियोजन बदलण्याचा व आहारही कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
व्हाईट हाऊसमधील स्वयंपाकघरामध्ये कमीकमी स्निग्धपदार्थ असलेले पदार्थ आणि कमी उष्मांक असणारे पदार्थ तयार करण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांच्या रोजच्या जेवणातून दररोज 500 कॅलरींचा आहार कमी केल्यास वजन कमी करण्याचे ध्येय नक्कीच साध्य करता येईल असे आहारतज्ज्ञांनी सांगितले आहे. यानुसार आठवड्याला एक पाऊंड वजन कमी करणे त्यांना शक्य आहे. माशाचा तुकडा किंवा बर्गर टाळले तर त्यांच्यासाठी ते आजिबात अशक्य नाही असं त्यांचं मत आहे.