"देवानं वाचवलं...", प्राणघातक हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 06:50 PM2024-07-14T18:50:45+5:302024-07-14T18:51:19+5:30
Donald Trump : पेनसिल्व्हेनिया येथील बटलरमधील एका प्रचार सभेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या संपूर्ण घटनेवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनियामध्ये जीवघेणा हल्ला झाला. पेनसिल्व्हेनिया येथील बटलरमधील एका प्रचार सभेदरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या कानात गोळी लागली. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या संपूर्ण घटनेवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "आपण प्रार्थना केल्याबद्दल सर्वांचे आभार, कारण केवळ देवानेच अकल्पनीय घटना घडण्यापासून रोखले. आम्ही घाबरणार नाही. वाईट गोष्टींचा सामना करण्याचा निर्धार करू. या घटनेत जे जखमी झाले ते बरे व्हावेत, यासाठी आम्ही प्रार्थना करतो. तसेच, त्या नागरिकाची आठवण राहील, ज्याला वाईट पद्धतीने मारले गेले."
पुढे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "यावेळी, आपण एकजूट राहणे आणि अमेरिकन म्हणून आपले खरे चरित्र दाखवणे हे नेहमीपेक्षा महत्त्वाचे आहे. दृढनिश्चयी राहा आणि वाईटाला जिंकू देऊ नका. मी माझ्या देशावर प्रेम करतो आणि तुम्हा सर्वांवर प्रेम करतो. या आठवड्यात विस्कॉन्सिनमधून देशवासियांसोबत बोलण्यास उत्सुक आहे."
BREAKING: Donald Trump pumps his fist as blood covers his face after ‘pops’ ring out. pic.twitter.com/XSLVR055bv
— Collin Rugg (@CollinRugg) July 13, 2024
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर असा झाला हल्ला...
डोनाल्ड ट्रम्प यांची बटलर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या सभेच्या मंचापासून जवळपास १२० मीटर अंतरावर एका कंपनीच्या छतावर हल्लेखोर लपून बसला होता. डोनाल्ड ट्रम्प भाषण करत असतानाच हल्लोखोराने त्यांच्या दिशेने गोळी झाडली. ही गोळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली. हे लक्षात येताच या सभेत एकच गोंधळ उडाला. यावेळी सुरक्षा रक्षक गोळीबारामुळे सावध झाले आणि मंचा शेजारी असलेल्या एका स्नायपरने हल्लोखोरावर निशाणा साधला आणि त्याचा खात्मा केला.