डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली काँग्रेस तहकुबीची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 05:53 AM2020-04-17T05:53:33+5:302020-04-17T05:53:47+5:30
प्रशासकीय कामकाजात येत आहेत अडथळे
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माझ्या उमेदवारांना (नॉमिनीज) सिनेटने कायम केले नाही, तर काँग्रेस तहकूब करीन, अशी धमकी बुधवारी दिली. नॉमिनीजच्या अनुपस्थितीमुळे प्रशासनाचे कामकाज सहजपणे होण्यात अडथळे येत आहेत. ‘सभागृहाने जर त्या तहकुबीला मान्यता दिली नाही, तर मी माझे घटनात्मक अधिकार वापरून काँग्रेसची दोन्ही सभागृहे तहकूब करीन’, असे ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये दैनिक पत्रकार परिषदेत म्हणाले.
अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय नियुक्त्यांना सिनेटने मान्यता न दिल्यामुळे ट्रम्प यांनी निराशा व्यक्त केली. हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज आणि सिनेटचे सत्र सुरू नसेल, तर ट्रम्प या विश्रांतीच्या काळात व्यक्तींना नियुक्त करण्यासाठी अध्यक्षांच्या अधिकारांचा वापर करू शकतात.
सध्या १२९ नियुक्त्या या सिनेटमध्ये पक्षपाती अडथळ्यामुळे अडकून पडलेल्या आहेत, असा आरोप ट्रम्प यांनी केला. अनेक जणांची नियुक्ती ही रिक्त जागांवर करायची असून, कोरोना विषाणूमुळे उभे ठाकलेले संकट आणि आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी या जागा भरणे अत्यावश्यक असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.