...तर वाइन, शॅम्पेन, मद्यावर २००% टॅक्स लावणार : ट्रम्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 07:40 IST2025-03-14T07:40:55+5:302025-03-14T07:40:55+5:30
अमेरिकेतील वाइन आणि शॅम्पेन उद्योगाला मोठा फायदा होईल, असे ट्रम्प यांनी म्हटलं

...तर वाइन, शॅम्पेन, मद्यावर २००% टॅक्स लावणार : ट्रम्प
संयुक्त राष्ट्र: जर युरोपियन युनियनने अमेरिकन व्हिस्कीवर लावलेले शुल्क कायम ठेवले तर अमेरिका युरोपमधून आयात होणाऱ्या वाइन, शॅम्पेन आणि मद्य उत्पादनांवर २०० टक्के शुल्क लावेल, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी दिली आहे.
स्टील आणि अॅल्युमिनियम आयातीवर शुल्क लादण्याच्या ट्रम्प यांच्या घोषणेनंतर युरोपियन युनियनने अमेरिकन व्हिस्कीवर ५० टक्के शुल्क लादले असून, हे शुल्क १ एप्रिलपासून लागू होणार आहे. युरोपियन संघाच्या या निर्णयावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष नाराज आहेत. त्यामुळेच त्यांनी ही धमकी दिली आहे. जर हे शुल्क त्वरित हटवले गेले नाही, तर अमेरिका लवकरच फ्रान्स आणि युरोपियन संघातील इतर देशांमधून येणाऱ्या सर्व वाइन, शॅम्पेन आणि मद्य उत्पादांवर २०० टक्के शुल्क लावेल. यामुळे अमेरिकेतील वाइन आणि शॅम्पेन उद्योगाला मोठा फायदा होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आपण सर्व एका जागतिक अर्थव्यवस्थेत राहत असल्याने सर्वकाही परस्परांशी जोडलेले आहे. त्यामुळे मुक्त व्यापाऱ्याच्या परिस्थितीचा सर्व देशांना लाभ होतो. मात्र, आपण व्यापार युद्धात उतरलो तर सर्व देशांचे नुकसान होईल, असे जागतिक व्यापारासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी स्पष्ट केले
कॅनडा, युरोपीय संघानेही केला पलटवार
अमेरिकेने स्टील व अॅल्युमिनियमच्या आयातीवरील करात मोठी वाढ केली. त्यामुळे अमेरिकेचे प्रमुख व्यापारी भागीदार देश नाराजी व्यक्त करत आहेत.
अमेरिकेच्या या निर्णयाला प्रत्युत्तर म्हणून कॅनडा व युरोपीय संघाने कापड व वॉटर हिटरपासून बार्बनसारख्या इतर अमेरिकन उत्पादनावर जास्त कर लावला आहे.
अमेरिकेला कॅनडा देशातून सर्वाधिक स्टील व अॅल्युमिनियमचा पुरवठा केला जातो. त्यामुळे स्टील उत्पादनावर २५ टक्के प्रत्युत्तरादाखल कर लावण्यासोबत उपकरणे, संगणक व सर्व्हर, डिस्प्ले मॉनिटर, खेळ उपकरणे व कच्चे लोखंड यांसारख्या अनेक वस्तूंवर कर लावण्याचा निर्णय कॅनडाने घेतला आहे.
व्यापार युद्धात सर्वांचेच नुकसान होणार आहे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने छेडलेल्या व्यापार युद्धामुळे कोणा एकाचे नाही तर सर्वांचे नुकसान होणार असल्याची भीती संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केली आहे. आपल्या कर धोरणात बदल करत अमेरिकेने जशास तसा कर लादण्याचा निर्णय घेतल्याने व्यापार युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे संयुक्त राष्ट्राकडून चिंता व्यक्त करण्यात आली.