इलॉन मस्क यांच्या पोलनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर हँडल पुन्हा सुरू; पण ट्रम्प म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 08:58 AM2022-11-20T08:58:00+5:302022-11-20T08:59:04+5:30
गेल्या वर्षी जानेवारीमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट कायमचे सस्पेंड करण्यात आले होते.
गेल्या वर्षी जानेवारीमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट कायमचे सस्पेंड करण्यात आले होते. सत्ता परिवर्तनाच्या काळात त्यांच्या ट्विटमुळे लोकांनी व्हाईट हाऊसवर हल्लाबोल केला होता. या निदर्शनात अनेकांचा मृत्यूही झाला. आता पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आहे. कारण ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क यांनी शनिवारी एका ट्विटमध्ये ट्रम्प यांचे अकाऊंट पुन्हा सुरू करायचे का? याबाबतचा पोल घेतला. त्यावर कोट्यवधी लोकांनी आपाल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पोलमधील निर्णयानुसार मस्क यांनी टॅम्प यांचं ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू केलं आहे. पण खुद्द ट्रम्प यांनाच ट्विटरवर पुनरागमन करण्यात रस राहिलेला नाही असं सांगण्यात येत आहे.
इलॉन मस्क यांच्या ट्विटरवर सुमारे १५ कोटी लोकांनी मतदान केलं आहे. स्काय न्यूजनुसार, माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा मात्र ट्विटरवर परतण्याचा कोणताही विचार नाही. त्यांनी त्यांच्या नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल' वर राहण्याचा निर्णय घेतला आहे. जरी ट्रम्प यांचे खाते realDonaldTrump ट्विटरवर पुन्हा सुरू केले गेले असले. तरी सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कोणतीही हालचाल दिसून आलेली नाही. जेव्हा मस्क यांनी घेतलेल्या पोलचा निकाल ट्विट केला तेव्हा त्यांनी ‘Vox Populi, Vox Dei’ या लॅटिन वाक्याचा वापर केला. ज्याचा अर्थ 'लोकांचा आवाज देवाचा आवाज आहे' असा होतो.
The people have spoken.
— Elon Musk (@elonmusk) November 20, 2022
Trump will be reinstated.
Vox Populi, Vox Dei. https://t.co/jmkhFuyfkv
ट्रम्प यांच्या हँडलचं निलंबन नैतिकदृष्ट्या चुकीचं
जेव्हा ट्रम्प यांचे ट्विटर हँडल सस्पेंड करण्यात आले तेव्हा ट्विटरनं ट्विटर सेफ्टी अकाऊंटवरून पोस्ट करून त्यामागचं कारण स्पष्ट केलं होतं. यापुढे हिंसाचार भडकू नये म्हणून हे निलंबन करण्यात येत असल्याचं ट्विटरनं म्हटलं होतं. यावर इलॉन मस्क यांनी वर्षाच्या सुरुवातीला कडक शब्दात नाराजी व्यक्त केली होती. ट्रम्प यांच्यावर बंदी घालणे ही 'चूक' होती जे नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे, असं मस्क म्हणाले होते. ट्रम्प यांच्या हँडलवरील कारवाईनंतर त्यांनी ट्रुथ सोशल नावाचं स्वत:ची नवी सोशल नेटवर्किंग साइट सुरू केली. जे हुबेहून ट्विटरसारखेच आहे. अगदी ट्विटरची कार्बन कॉपी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.