अखेर ट्रम्प यांनी 'तो' निर्णय घेतलाच; अमेरिकेत १५२ वर्षांनंतर प्रथमच 'असं' घडणार
By कुणाल गवाणकर | Published: January 8, 2021 11:34 PM2021-01-08T23:34:27+5:302021-01-08T23:36:26+5:30
कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांना पदावरून दूर केलं जाण्याची शक्यता
वॉशिंग्टन: अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी काल अमेरिकन संसदेत प्रचंड गोंधळ घातला. ट्रम्प यांनी सुरुवातीला त्यांच्या या गोंधळी समर्थकांची पाठराखण केली. त्यामुळे जगभरातून ट्रम्प यांच्या वर्तणुकीवर टीका झाली. फेसबुक, इन्स्टाग्रामनं ट्रम्प यांच्या कथित चिथावणीखोर पोस्ट काढून टाकल्या आणि ट्रम्प यांची खाती अनिश्चित काळासाठी बंद केली. जगभरातून टीका झाल्यानंतर ट्रम्प यांनी संसद परिसरात झालेल्या गोंधळाबद्दल नाराजी व्यक्त केली.
ट्रम्प समर्थकांचा राडा, अमेरिकी संसद धरली चार तास वेठीस
समर्थकांनी घातलेल्या गोंधळामुळे संपूर्ण जगातून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका झाली. त्यानंतर आता ट्रम्प यांनी २० जानेवारीला होणाऱ्या शपथविधीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडन २० जानेवारीला अध्यक्षपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला आपण जाणार नसल्याची माहिती ट्रम्प यांनी ट्विट करून दिली आहे. मावळते अध्यक्ष आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या शपथविधीला अनुपस्थित राहिल्याचा प्रकार याआधी अमेरिकेत १८६९ मध्ये घडला होता. त्यावेळी एँड्यू जॉन्सन नव्या अध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहिले होते.
"... लाज वाटायला हवी," अमेरिकेतील हिंसक आंदोलनादरम्यान तिरंगा दिसल्यानं शिवसेना खासदाराचा संताप
मावळत्या अध्यक्षांनी नव्या अध्यक्षांच्या शपथविधीला अनुपस्थित राहण्याचा प्रकार गेल्या १५२ वर्षांत अमेरिकेत घडलेला नाही. २०१७ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा उपस्थित राहिले होते. ओबामांनी २००९ मध्ये अध्यक्ष पदाची सूत्रं हाती घेतली. त्यावेळी मावळते अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश सोहळ्याला उपस्थित होते.
अमेरिकेतील सत्तासंघर्षावर रामदास आठवले साधणार ट्रम्प यांच्याशी संवाद
ट्रम्प यांच्या कार्यकर्त्यांनी अमेरिकेच्या संसदेत धुडगूस घातल्यानं ट्रम्प यांचा अध्यक्षीय कार्यकाळ संपण्यापूर्वीच त्यांना पदावरून दूर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. काही सिनेटर्सदेखील ट्रम्प यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांना पदावरून काढून टाकण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. सीएनएननं दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. त्यामुळे सीनेट त्यांना भविष्यात फेडरल ऑफिसमध्ये येण्यापासून रोखू शकते. सीनेटनं विरोधात मतदान केल्यास ट्रम्प कायमचे अपात्र ठरतील. तशी तरतूद अमेरिकेच्या घटनेत आहे.