डोनाल्ड ट्रम्प पगारामध्ये घेणार फक्त १ डॉलर
By admin | Published: November 14, 2016 11:28 AM2016-11-14T11:28:53+5:302016-11-14T11:26:54+5:30
अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षाला फक्त १ डॉलर वेतन म्हणून घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. १४ - अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षाला फक्त १ डॉलर वेतन म्हणून घेणार असल्याचे जाहीर केले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला वर्षाला ४ लाख डॉलरचे वेतन मिळते. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी संभाळताना मी वर्षाला फक्त १ डॉलर वेतन म्हणून घेईन तसेच सुट्टयाही घेणार नाही असे ट्रम्प यांनी एका मुलाखतीत सांगितले.
सप्टेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष झालो तर वेतन घेणार नाही असे आश्वासन दिले होते. अजून भरपूर काम करायचे बाकी आहे. त्यामुळे मी सुट्टयाही घेणार नाही असे ट्रम्प यांनी सांगितले.
आरोग्य सेवा सुधारण्याबरोबर त्यांनी कर कपातीचेही संकेत दिले. सीबीएस वाहिनीला त्यांनी मुलाखत दिली. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतील नावाजलेले उद्योगपती असून, ते गर्भश्रीमंत आहेत. मागच्या आठवडयात अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिस्पर्धी उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा पराभव करुन अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.
बेताल वक्तव्यामुळे ट्रम्प सुरुवातीपासूनच चर्चेत आहेत. राष्ट्राध्यक्षपदाचा त्यांचा कार्यकाळ जागतिक अनिश्चिततेत अधिकच भर घालणारा आहे असा सूर अनेकांनी लावला आहे.