इंडियानामध्ये डोनाल्ड ट्रम्प विजयी, टेड क्रूज शर्यतीतून बाहेर
By admin | Published: May 4, 2016 09:21 AM2016-05-04T09:21:28+5:302016-05-04T09:21:28+5:30
इंडियानात झालेल्या प्राथमिक निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी टेड क्रूज यांचा पराभव करत मोठा विजय मिळवला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
वॉशिंग्टन, दि. 04 - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकासाठी शर्यतीत असलेले डोनाल्ड ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवार मिळणार हे आता निश्चित झाल्याचं दिसत आहे. इंडियानात झालेल्या प्राथमिक निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी टेड क्रूज यांचा पराभव करत मोठा विजय मिळवला आहे. उमेदवारी मिळण्याच्या दृष्टीने इंडियानामधील निवडणूक अत्यंत महत्वाची मानली जात होती.
अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी दाखवण्यास सुरुवातदेखील केली आहे. इंडियाना प्राथमिक निवडणुकीत ट्रम्प यांनी 50 टक्क्यांहून जास्त मतं मिळाली आहेत. ट्रम्प यांच्याविरोधात झालेल्या पराभवानंतर टेड क्रूज यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली असल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. यामुळे ट्रम्प यांचा पुढचा मार्ग सोप्पा झाला आहे.
ट्रम्प यांचा मोठा विजय झाला असताना दुसरीकडे डेमोक्रॅटिक पार्टीच्या हिलरी क्लिंटन यांना मात्र सँडर्स यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. ही निवडणूक टेड क्रूज यांच्यासाठी अत्यंत महत्वाची होती, त्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं. या निवडणुकीत पराभव झाल्यास आपण शर्यतीतून माघार घेऊ असं क्रूज यांनी सांगितल नव्हतं मात्र एका खास परिस्थितीत असेन असं स्पष्ट केलं होतं.
नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकनचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिककडून हिलरी क्लिंटन यांच्यात लढत अपेक्षित आहे. आपल्या समर्थकांना उद्देशून बोलताना ट्रम्प म्हणाले होती की, इंडियानात मोठी लढत होत आहे. कारण, आम्ही येथे जिंकलो तर विरोधक आपोआपच मार्गातून दूर होणार आहेत. मायक्रोसॉफ्टच्या एका सहयोगी संस्थेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार ७ जून रोजीच्या रिपब्लिकन प्रायमरीच्या अखेरीस ट्रम्प यांच्याकडे १३६६ प्रतिनिधींचे समर्थन असेल, तर हिलरी यांच्याकडे २६७६ प्रतिनिधी असतील.