'६० दिवसांच्या बंदीचा फटका एच-१ बी व्हिसाधारकांना नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 04:07 AM2020-04-24T04:07:43+5:302020-04-24T04:08:24+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांचे धोरण; भारतीयांना दिलासा
वॉशिंग्टन : अमेरिकेने स्थलांतरित लोकांना येण्यास ६० दिवसांची बंदी घातली असली तरी त्यामुळे एच-१ बी व्हिसाधारकांची गैरसोय होणार नाही, असे त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यामुळे भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण एच-१ बी व्हिसाधारकांमध्ये भारतीय आयटी इंजिनिअर व नोकरदारांचे लक्षणीय प्रमाण आहे.
ट्रम्प म्हणाले की, ‘‘ज्यांना अमेरिकेचे कायमस्वरूपी नागरिकत्व हवे आहे, त्यांना सध्या आमच्या देशात येण्यावर काही काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यातही काही सवलती देण्याचा विचार सरकार करीत आहे. ज्यांना तात्पुरत्या निवासासाठी यायचे आहे, त्यांना ही बंदी लागू नाही.’’ स्थलांतरितांवर घातलेल्या तात्पुरत्या बंदीसंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री टष्ट्वीट केले. बंदीचा लेखी आदेश बुधवारी जारी करण्यात आला. कोरोना साथीने अमेरिकेत हाहाकार माजविला असून, सर्व उद्योगधंदे सध्या बंद ठेवण्यात आले आहेत. त्या देशातील असंख्य लोक बेरोजगार झाले आहेत.
अमेरिकेला प्राधान्य
अमेरिकेला सर्वोच्च प्राधान्य हे ट्रम्प यांच्या राजकारणाचे सूत्र असून, त्यानुसारच ट्रम्प बंदीसारखे निर्णय घेत आहेत. त्याचा फटका ग्रीन कार्डसाठी अर्ज केलेल्यांनाही बसणार आहे. त्यात अमेरिकेत राहत असलेल्या भारतीयांचाही समावेश आहे.