डोनाल्ड ट्रम्पच्या निर्णयावर गुगल, फेसबूक संतप्त
By admin | Published: January 29, 2017 07:53 AM2017-01-29T07:53:29+5:302017-01-29T07:53:29+5:30
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि फेसबूकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या व्हिसा पॉलिसीवर टीका केली
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 29 - भारतीय मूळचे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि फेसबूकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या व्हिसा पॉलिसीवर टीका केली आहे. अमेरिकेच्या नव्या व्हिसा पॉलिसीद्वारे सात मुस्लीम देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यावर जगभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंबंधीच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. ‘विदेशी अतिरेक्यांच्या अमेरिकेतील प्रवेशापासून देशाची सुरक्षा’ असे या आदेशाचे नाव आहे. या आदेशानुसार इराण, इराक, सुदान, सिरिया, लिबिया, सोमालिया आणि येमेन या देशांतील नागरिकांना ३0 दिवसांपर्यंत अमेरिकेत प्रवेश करता येणार नाही.
ट्रम्प यांचा हा निर्णय म्हणजे अमेरिकेत नव्याने येऊ घातलेल्या टॅलेंटसाठी अडथळा आहे. या निर्णयाचा गुगलच्या जवळपास 187 कर्मचा-यांवर परिणाम होईल असं ते म्हणाले. या निर्णयामुळे गुगलने आपल्या प्रवासी कर्मचा-यांना माघारी बोलावलं आहे. तर फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनीही या निर्णयावर टीका केली. या आदेशामुळे मला चिंता वाटते. असंख्य अमेरिकींप्रमाणेच मीही स्थलांतरिताचा मुलगा आहे असं फेसबुकवरील आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे.
नोबेल पारितोषिक विजेती विद्यार्थिनी मलाला युसुफझई हिनेही ट्रम्पच्या निर्णयाचा विरोध केला आहे. या बंदी आदेशामुळे माझे हृदय विदीर्ण झाले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा हा निर्णय योग्य नाही असं ती म्हणाली.