डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणींत वाढ; महाभियोग प्रस्ताव सादर, उद्या मतदानाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 09:13 AM2021-01-12T09:13:12+5:302021-01-12T09:14:09+5:30
Donald Trump impeachment in US: पेलोसी यांच्या टीमने बनविलेले 25 वे संशोधन लागू करण्यासाठी उपराष्ट्रपती माईक पेन्स आणि कॅबिनेटच्या मंत्र्यांना रात्री उशिरा या मसुद्यावर मतदान करण्यास सांगण्यात येणार आहे. संसदेचे अधिवेशन सुरु नसल्याने या मतदानावर संकट येऊ शकते.
अमेरिकेच्या संसदेत गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारामुळे महासत्ता हडबडली आहे. मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेला अडचणीत आणण्यासाठी अण्वस्त्रांचा हल्ला कोणत्याही देशावर करू शकतात अशी भीती असतानाचा डेमोक्रेट सदस्यांनी ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावावर उद्या मतदान होण्याची शक्यता आहे. या मुळे ट्रम्प यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
प्रस्ताव सादर झाल्यानंतर संसदेत बहुमत असलेले नेते स्टेनी होयर यांनी सांगितले की, जर हा प्रस्ताव संमत झाल तर डोनाल्ड ट्रम्प हे पहिले रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष असतील ज्यांना दोनदा महाभियोगाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे या प्रस्तावाला विरोध करताना रिपब्लिकन सदस्य एलेक्स मुने यांनी सांगितले की, सदनाने हा प्रस्ताव फेटाळावा.
प्रतिनिधी सभेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी आरोपांचा मसुदा संसदेत ठेवण्याआधी सांगितले की, आमचे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी आम्हाला तत्काळ पाऊले उचलायला हवीत. कारण राष्ट्राध्यक्ष पदी ट्रम्प यांचे राहणे संविधानाला धोक्याचे आहे.
पेलोसी यांच्या टीमने बनविलेले 25 वे संशोधन लागू करण्यासाठी उपराष्ट्रपती माईक पेन्स आणि कॅबिनेटच्या मंत्र्यांना रात्री उशिरा या मसुद्यावर मतदान करण्यास सांगण्यात येणार आहे. संसदेचे अधिवेशन सुरु नसल्याने या मतदानावर संकट येऊ शकते. यामुळे हे पाऊल उचलले जाणार असून त्यानंतरच मंगळवारी पूर्ण सदनासमोर हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. हा मसुदा मांडल्यानंतर पेंस आणि कॅबिनेटकडे महाभियोग प्रस्तावावर कार्यवाही करण्यासाठी 24 तासांची वेळ असणार आहे.
गेल्या आठवड्यात संसदेत नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या निवडीची औपचारिकता सुरू असताना ट्रम्प समर्थकांनी संसदेवर हल्लाबोल केला. यावेळी झालेल्या हिंसाचारात पाच जण ठार झाले. त्यात एका पोलिसाचाही समावेश होता.
उर्वरित दिवसही अध्यक्षपदी ठेवणे धोक्याचे
अमेरिकी संसदेवर ट्रम्प समर्थकांनी केलेल्या या हल्ल्याचे सर्वदूर पडसाद उमटले. ट्रम्प यांना उर्वरित दिवसही अध्यक्षपदी ठेवणे धोक्याचे असून त्यांच्यावर महाभियोगाची कारवाई केली जावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नॅन्सी पेलोसी यांनी या आठवड्यात सर्व संसद सदस्यांनी राजधानी वॉशिंग्टन येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी त्यांच्यावर दडपण आणले जाणार आहे. त्यांनी या दडपणाला थारा न दिल्यास ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई केली जाऊ शकते, त्यासाठी सर्व संसद सदस्यांनी राजधानीत उपस्थित राहणे गरजेचे आहे, असे पेलोसी यांनी स्पष्ट केले. २० जानेवारी रोजी ट्रम्प यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे.