डोनाल्ड ट्रम्प यांचे 'गोल्फ' प्रेम अन् 13 दिवसांत अमेरिकन करदात्यांचे 156 कोटी रुपये स्वाहा..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 21:08 IST2025-03-09T21:08:11+5:302025-03-09T21:08:39+5:30
Trump Golf weekends : डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोल्फ खेळण्यावर विरोधकांकडून टीका होत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे 'गोल्फ' प्रेम अन् 13 दिवसांत अमेरिकन करदात्यांचे 156 कोटी रुपये स्वाहा..!
Donald Trump Golf : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गोल्फ खेळाची खूप आवड आहे. परंतु त्यांच्या या आवडीमुळे अमेरिकन करदात्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. एका अहवालानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोल्फ वीकेंड्समुळे आतापर्यंत अमेरिकन करदात्यांना $18 मिलियन जास्त नुकसान झाले आहे.
ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळातील 48 पैकी 13 दिवस गोल्फ खेळण्यात घालवले आणि यावर लाखो डॉलर्स खर्च झाले. राष्ट्राध्यक्षांचा हा महागडा छंद म्हणजे सरकारी पैशाची उधळपट्टी आहे, असे टीकाकारांचे म्हणणे आहे, तर समर्थक याला वैयक्तिक पसंती म्हणतात. दरम्यान, पॅलेस्टाईन समर्थकांनी शनिवारी(08 मार्च 2025) रोजी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मालकीच्या टर्नबेरी गोल्फ रिसॉर्टमध्ये तीव्र निषेध केला. आंदोलकांनी भिंतींवर 'फ्री गाझा' आणि 'गाझा विक्रीसाठी नाही' अशा घोषणा लिहिल्या आणि तोडफोडही केली.
गोल्फ आणि ट्रम्प
फार कमी लोकांना माहितेय की, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे 16 पेक्षा जास्त गोल्फ कोर्स आहेत, त्यापैकी बहुतेक युनायटेड स्टेट्स, स्कॉटलंड, आयर्लंड आणि UAE मध्ये आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या 2005 च्या पुस्तक "मला मिळालेला सर्वोत्कृष्ट गोल्फ सल्ला" मध्ये लिहिले की, "माझ्यासाठी आणि जगभरातील लाखो लोकांसाठी गोल्फ हा खेळापेक्षा अधिक आहे."
ट्रम्प यांच्या गोल्फ ट्रिपची किंमत
डोनाल्ड ट्रम्प यांनी 2017 ते 2020 या त्यांच्या पहिल्या कार्यकाळात गोल्फ ट्रिपसाठी एकूण खर्च $151.5 मिलयन खर्च केले होते. 2019 मध्ये गव्हर्नमेंट अकाउंटेबिलिटी ऑफिस (GAO) च्या अहवालानुसार, फ्लोरिडामध्ये त्यांचा शनिवार व रविवारचा खर्च $18 मिलियनवर पोहोचला होता. सुरक्षेच्या कारणास्तव ट्रम्प यांच्या गोल्फ ट्रिप अत्यंत महाग असल्याचे म्हटले जाते. राष्ट्राध्यक्षांच्या हवाई प्रवासावरही लाखो डॉलर्स खर्च होतात.
गोल्फ आणि राजकारण
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवडीवर विरोधक टीका करत आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या सुट्ट्यांचा आणि वैयक्तिक आवडीचा खर्च करदात्यांनी का सोसावा? इतकी सुरक्षा आणि लष्करी संसाधनांचा वापर न्याय्य आहे का? हा सरकारी निधीचा दुरुपयोग नाही का? असे प्रश्न विचारले जात आहेत. तर, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाही गोल्फ खेळायचे, पण मीडियाने त्यांना टार्गेट केले नाही. गोल्फ हा ट्रम्प यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असे समर्थकांचे मत आहे.