US Election: ट्रम्प यांचा सुप्रीम कोर्टाचा मार्ग अवघड; याचिका दाखल करून घेण्यास कोर्ट अनुत्सुक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2020 01:44 AM2020-11-08T01:44:34+5:302020-11-08T07:02:17+5:30
सन २००० मध्ये तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश आणि अल गोर यांच्यात फ्लोरिडातील मतमोजणीसंदर्भात तिढा निर्माण झाला होता.
वॉशिंग्टन : अध्यक्षीय निवडणुकीत पराभव समोर दिसू लागताच आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप करत निवडणूक प्रक्रियेला सुप्रीम कोर्टात आव्हान देणयाची भाषा करणारे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मात्र तसे करणे अंमळ कठीण जाणार असल्याचे चित्र आहे.
सर्व वैध मते मोजली तर मीच पुन्हा अध्यक्ष होईन असे सांगत रिपब्लिकन पक्षाचे बालेकिल्ले समजल्या जाणाऱ्या राज्यांमध्ये फेरमतमोजणी करा, अशी मागणी करणाऱ्या ट्रम्प यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. निवडणूक प्रक्रियेला आक्षेप घेणाऱ्या याचिकाही त्यांच्या प्रचारयंत्रणेने काही राज्यांत दाखल केल्या. मात्र, त्यातल्या अनेक याचिका फेटाळून लावण्यात आल्या. परंतु तरीही सुप्रीम कोर्टात जाण्याचा त्यांचा इरादा पक्का आहे.
सन २००० मध्ये तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश आणि अल गोर यांच्यात फ्लोरिडातील मतमोजणीसंदर्भात तिढा निर्माण झाला होता. त्यावेळी बुश यांनी सुप्रीम कोर्टाकडे दाद मागितली होती. सुप्रीम कोर्टातील न्यायवृंदाने बुश यांच्या बाजूने निकाल देत फ्लोरिडात फेरमतमोजणी करण्याचे आदेश दिले होते. आताही ट्रम्प यांनी काही राज्यांत फेरमतमोजणीची मागणी केली असली तरी सुप्रीम कोर्टातील सहा न्यायाधीशांपैकी तीन न्यायाधीश ट्रम्प प्रशासनानेच नियुक्त केले आहेत. विद्यमान सरन्यायाधीश जॉन रॉबर्टस् निवडणुकीसंदर्भातील याचिका दाखल करून घेण्यास फारसे उत्सुक नाहीत. त्यामुळे ट्रम्प यांचा सुप्रीम कोर्टात जाण्याचा मार्ग अवघड असल्याचे दिसून येत आहे.